News

MI vs DC प्रीव्ह्यू: तीन पराभवांनंतर हार्दिक अँड कंपनीला विजयाची आतुरता

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स टीम आयपीएल २०२४ चा आपला चौथा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळायला तयार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवार दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल.

हार्दिक पांड्या अँड कंपनीला या सीझनमध्ये आपला पहिला विजय मिळवण्याची उत्सुकता आहे. आपल्या टीमला या सीझनमध्ये आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही.

एमआयच्या खेळाडूंनी आतापर्यंत आयपीएल २०२४ मध्ये तीन सामने खेळले आहेत. परंतु या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सीझनमध्ये आतापर्यंत तिलक वर्माने एमआयसाठी सर्वाधिक १२१ धावा केल्या आहेत. त्याने या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सर्वाधिक ६४ धावा देखील केल्या आहेत. परंतु या सामन्यात आपल्या ब्लू अँड गोल्ड टीमला पराभव पत्करावा लागला होता.

आकाश मधवाल आणि जसप्रीत बुमरा यांनी तीन सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आहेत.

आता आपल्या टीमला या सामन्यात बुमरा, एन्रिक नॉर्किया आणि आकाश मधवाल यांच्याकडून उत्तम गोलंदाजीची अपेक्षा असेल.

एमआयला पुन्हा एकदा आपल्या टॅलेंटेड खेळाडूंकडून उत्तम कामगिरीची आशा आहे जेणेकरून टीमला विजयाचे खाते उघडता येऊ शकेल.

आपली टीम सध्या गुणतक्त्यात सर्वांत खाली आहे. दिल्ली कॅपिटल्स चार सामन्यांमध्ये एक विजय प्राप्त करून नवव्या क्रमांकावर आहे.

आकडेवारी

या दोन्ही टीम्सच्या आकडेवारीचा विचार करता आतापर्यंत या दोन्ही टीम्सनी ३३ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. त्यात मुंबई इंडियन्सने १८ वेळा तर दिल्ली कॅपिटल्सने १५ वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे आपल्या टीमचे पारडे जड असल्याचे दिसते.

काय: आयपीएल २०२४ चा २० वा सामना. मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स

कधी: रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ . दुपारी ३.३० वाजल्यापासून.

कुठे: वानखेडे स्‍टेडियम, मुंबई

काय अपेक्षा आहे: आपल्या टीमला सीझनचा पहिला विजय मिळवताना पाहणे. आपले घरचे मैदान आपल्या खेळाडूंच्या दमदार खेळाची वाट पाहते आहे.

आपण काय करायचे आहे: पलटन तुम्ही स्टेडियमवर असा किंवा आपल्या टीव्ही स्क्रीनसमोर. तुम्ही आपल्या टीमचा नेहमीप्रमाणेच उत्साह वाढवा. तुम्ही आत्तापर्यंत हेच करत आला आहात.