आशिया कप २०२२- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग आठव्या विजयासाठी सज्ज

आशिया कपच्या आगामी मालिकेत सध्याचे अजिंक्यपद असलेला भारतीय संघ आपले वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहे. यंदा आशिया कपचे आयोजन तब्बल चार वर्षांनी २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान केले जाणार आहे. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) १९८४ साली आशिया कप क्रिकेट मालिकेला सुरूवात झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघ हा या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी विक्रमी सात वेळा मालिका जिंकली आहे. (सहा एकदिवसीय मालिका आणि एक टी२०आय). 

आशिया कप २०२२ हे या आशिया खंडातील प्रतिष्ठित स्पर्धेचे १५ वे आयोजन आहे. यापूर्वी ही प्रतिष्ठेची मालिका सप्टेंबर २०२० मध्ये आयोजित करण्याचे ठरले होते परंतु ती कोविड-१९ जागतिक साथीमुळे पुढे ढकलण्यात आली. 

सुरूवातीला श्रीलंकेत आशिया कप २०२२ चे आयोजन करण्याचे ठरले होते. परंतु श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाचा विचार करून ही मालिका आता संयुक्त अरब अमिरातीत खेळवली जाईल. 

आगामी आशिया कप इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच टी२० स्वरूपात खेळवला जाईल. आशिया कपच्या पहिल्या टी२० मालिकेचे आयोजन बांग्लादेशमध्ये २०१६ मध्ये करण्यात आले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मिरपूर येथे आयोजित अंतिम फेरीत बांग्लादेशचा आठ विकेट्सनी पराभव केला आणि कप जिंकला. 

आशिया कप २०२२ च्या विजयासाठी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ उत्सुक आहेत. हाँगकाँगने चार संघांच्या आशिया कप क्वालिफायर्स जिंकल्यानंतर मुख्य स्पर्धेत स्थान मिळवले. या स्पर्धेत सिंगापूर, यूएई आणि कुवेतचे संघदेखील सहभागी झाले. 

ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू तर पात्र ठरलेला हाँगकाँगचा संघ आहे. ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका यांचे संघ आहेत. 

श्रीलंका आशिया कप २०२२ च्या शनिवार दिनांक २७ ऑगस्ट रोजीच्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आयोजित पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानशी दोन हात करणार आहे. 

दरम्यान भारताचा स्पर्धेतील पहिला सामना आपले पारंपरिक शत्रू पाकिस्तानसोबत त्याच ठिकाणी रविवारी होणार आहे. 

गंमत म्हणजे आगामी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमनेसामने येतील. 

आशिया कपच्या इतिहासात भारताचे पाकिस्तानवर चांगलेच वर्चस्व राहिले आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले असून पाकिस्तानने फक्त पाच सामने जिंकले आहेत. 

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने २०१६ मध्ये बांग्लादेशमधील शेर ए बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील एकमेव टी२०आय सामन्यात पाकिस्तानवर पाच विकेट्सनी विजय प्राप्त केला होता. 

ग्रुप एच्या दुसऱ्या सामन्यात भारत हाँगकाँगसोबत टी२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच खेळणार आहे. भारत आणि हाँगकाँगचे संघ यापूर्वी दोनवेळा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकमेकांशी खेळले असून भारताने दोन्ही वेळा विजय प्राप्त केला आहे. 

ग्रुप बीमध्ये श्रीलंका विरूद्ध बांग्लादेश हा सामना खूप उत्कंठावर्धक ठरेल. पाच वेळा आशिया कप जिंकलेल्या श्रीलंकेचे बांग्लादेशविरूद्ध वर्चस्व आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यांपैकी ११ सामने जिंकले आहेत. परंतु बांग्लादेशने आशिया कपमध्ये श्रीलंकेविरूद्ध मागील दोन सामने जिंकले आहेत. 

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील सध्याचा चॅम्पियन असलेला भारतीय संघ सामन्यापूर्वीचा आवडता संघ म्हणून आशिया कपमध्ये गणला जाईल. 

टी२०आय स्वरूपात भारतीय संघाचा फॉर्म सध्या उत्तम आहे. त्यांनी वेस्ट इंडिज, इंग्लंड, आयर्लंडमध्ये मालिका जिंकल्या आहेत तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका बरोबरीत सोडवली आहे. 

याशिवाय भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये आशिया कप जिंकला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ५४ सामन्यांपैकी ३६ सामने जिंकले असल्यामुळे भारताकडे एक बलाढ्य संघ म्हणून पाहिले जात आहे. भारताने फक्त १६ वेळा स्पर्धा हरली असून त्यांची विजयी टक्केवारी ६८.८६ टक्के आहे. 

भारतीय संघात या वेळी प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराची कमतरता जाणवेल. तो दुखापतीमुळे खेळणार नाही. 

सध्याचा फॉर्म आणि आशिया कपमधील मागील रेकॉर्ड यांचा विचार करता रोहित शर्मा आणि संघ हे सलग आठव्या वेळी मालिका जिंकण्यासाठी सज्ज असतील. 

क्रिकेटप्रेमींची प्रचंड उत्कंठा असलेला भारत विरूद्ध पाकिस्तानचा आशिया कपचा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार (आयएसटी) ७.३० वाजता सुरू होईल. 

भारत आणि पाकिस्तान या तगड्या प्रतिस्पर्ध्यांमधला रोमहर्षक सामना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पॉपकॉर्न तयार आहेत ना, पलटन!