आशिया कप 2022- सूर्या कोहलीच्या खेळामुळे भारताचा सुपर 4 मध्ये प्रवेश

भारतीय क्रिकेट संघाने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आयोजित आशिया कप २०२२ च्या त्यांच्या दुसऱ्या आणि अंतिम ग्रुप ए सामन्यात हाँगकाँगच्या संघाचा ४० धावांनी  पराभव केला.

सूर्यकुमार यादवची २६ चेंडूंवर ६८ धावांची आणि विराट कोहलीची ४४ चेंडूंवर ५९ धावांची दमदार खेळी भारताला २० ओव्हर्समध्ये १९२/२ पर्यंत घेऊन गेली. प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या हाँगकाँगच्या संघाला आपल्या २० ओव्हर्समध्ये फक्त १५२/५ अशी कामगिरी करता आली. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

त्याचवेळी दोन सामन्यांत दोन विजय मिळाल्यामुळे भारतीय संघ संयुक्त अरब अमिरातींमध्ये (यूएई) आशिया कप २०२२ च्या सुपर ४ स्टेजमध्ये पोहोचणारा अफगाणिस्ताननंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

त्यापूर्वी हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघ फलंदाजीला उतरला.

ओपनर्स केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारताला एक चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी ४.४ ओव्हर्समध्ये ३८ धावा फटकावल्या. त्यानंतर तरूण जलदगती गोलंदाज आयुष शुक्ला याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला १३ चेंडूंवर २१ धावा काढून बाद केले.

त्यानंतर विराट कोहली केएल राहुलसोबत क्रीझवर खेळायला आला. त्या दोघांनी मधल्या फळीतील फलंदाजांसाठी खेळण्याचा एक उत्तम पाया रचला.

परंतु मधल्या ओव्हर्समधील संथ स्थितीचा फायदा उचलून हाँगकाँगच्या गोलंदाजांनी राहुल आणि कोहली या दोघांनाही शांत ठेवले.

राहुलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो लेग स्पिनर मोहम्मद गझनफारच्या चेंडूवर १३ व्या ओव्हरच्या शेवटी ३९ चेंडूंवर ३६ धावा काढून बाद झाला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आणि उत्तम फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव यानेही आपली इनिंग अत्यंत सुंदर सुरू केली. त्याने डीप स्क्वेअर लेगमधून एकामागून एक फटके टोलवून त्याने खेळात जान आणली.

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज आणि विराट कोहली यांनी खेळाचा वेग वाढवण्यासाठी हाँगकाँगच्या गोलंदाजांवर हल्ला करायचे ठरवले.

दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वांत लहान स्वरूपात सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या रोहितच्या विक्रमाशी बरोबरी करत कोहलीने आपले ३१ वे टी२०आय अर्धशतक पूर्ण केले.

दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव हाँगकाँगवर आणखी दबाव टाकत होता. त्याने अत्यंत सुंदर स्कूप्स आणि ड्राइव्ह्स फटकावून टी२०आय क्रिकेटमधले आपले सहावे अर्धशतक पूर्ण केले.

जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या टी२०आय फलंदाज सूर्याने हारून अर्शदच्या चेंडूवर सहा षटकार ठोकले. त्याने फक्त २६ चेंडूंवर नाबाद ६८ धावा केल्या आणि भारताला २० ओव्हर्समध्ये १९२/२ पर्यंत नेऊन पोहोचवले.

गंमतीचा भाग म्हणजे यादव आणि कोहली यांनी शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये ७८ धावा कुटल्या. टी२०आयमध्ये डेथ ओव्हर्समध्ये भारताच्या या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत.

अत्यंत कठीण १९३ धावांचे आव्हान पेलत असताना हाँगकाँगचा ओपनर यासीम मुर्तझा याला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याने लगेचच बाद केले. त्यामुळे हाँगकाँगचा संघ पिछाडीवर गेला.

बाबर हयात आणि कर्णधार निझाकत खान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली आणि हाँगकाँगला ५० धावांपलीकडे नेले.

हाँगकाँग पुन्हा खेळावर पकड पक्की करत आहे असे दिसत असतानाच निझाकत खान दुर्दैवी पद्धतीने रनआऊट होऊन पॅव्हिलियनला परतला.

बाबर हयातने ३५ चेंडूंमध्ये ४१ धावांची देखणी खेळी केली. त्यानंतर डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजा याने त्याची महत्त्वाची विकेट घेतली.

हाँगकाँगचे फलंदाच किंचीत शाह (३०) आणि झीशान अली (२६ नाबाद) यांनी चांगला खेळ केला. परंतु तरीही या हाँगकाँगला विजयासाठी ४० धावा कमी पडल्या.

भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग,, रवींद्र जडेजा आणि आवेश खान यांनी भारतासाठी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

सूर्यकुमार यादवचा त्याच्या सामना विजयी करून देणाऱ्या कामगिरीमुळे सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला.

भारताचा आता त्यांच्या पहिल्या सुपर ४ मध्ये ग्रुप ए मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी रविवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.