मागच्या दोन महिन्यांत मी खेळ सुधारला आणि एक खेळाडू म्हणून समृद्ध झालोः टिम डेव्हिड

टाटा आयपीएल सीझनचे दुसरे सत्र टिम डेव्हिडसाठी खूप चांगले ठरले. त्याने २१६.२७ इतक्या धमाकेदार स्ट्राइक रेटने त्याने १८६ धावा काढल्या. त्याने प्रत्येक इनिंगच्या शेवटी येऊन प्रेक्षकांना अक्षरशः आनंदाची पर्वणीच दिली.

भारतातल्या आपल्या कालावधीत त्याला चांगली कामगिरी करता आली असे त्याला वाटते.

"मी खूप सुधारणा केल्या असे मला वाटते. हे माझे सर्वांत मोठे ध्येय होते. मागच्या अडीच महिन्यांत एक खेळाडू म्हणून स्वतःला विकसित केले तर पुढे जाताना मला खूप चांगल्या संधी मिळतील असे मला वाटत होते. माझी प्रगती पाहून मला खूप आनंदद होतोय," असे डेव्हिडने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

फिनिशरची भूमिका अत्यंत कठीण असू शकते. परंतु टिम डेव्हिडला अत्यंत साध्या विचारसरणीचा शांत राहून आपल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी फायदा झाला.

“कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढणे आवश्यक आहे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत, पिचेस आणि वातावरणात, कधीकधी नवीन लीगमध्ये खेळल्याने आणि तुम्ही ज्या लोकांसोबत आधी कधीच खेळलेले नाही आहात त्यांच्यासोबत खेळल्याने या गोष्टी बदलतात. परंतु तुम्ही मैदानात खेळायला उतरता तेव्हा गोष्टी शक्य तितक्या सुलभ ठेवणे महत्त्वाचे असते. शक्य तितक्या जवळून चेंडू पाहा, तुमचे मन रिकामे ठेवा आणि आक्रमक खेळ करा,” डेव्हिड म्हणाला.

मागच्या वर्षी त्याने खालच्या क्रमाला येऊन खेळ केला असला तरी डेव्हिडच्या मते तो एक स्पेशालिस्ट नाही आणि तो टीममध्ये जास्तीत जास्त योगदान कशा प्रकारे देऊ शकतो या गोष्टीचा विचार करतो.

“मी एखाद्या सामन्यात फलंदाजी करतो तेव्हा मला टेंपो आणि हेतू एकसमान ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या खेळासाठी हे खूप महत्त्वाचे ठरते. मला एक फिनिशर म्हणून फक्त एक कामगिरी करायची नसते. सर्व परिस्थितीत फलंदाजी करणे शक्य व्हायला हवे आणि माझ्या टीमसाठी सामने जिंकण्यावर प्रभाव टाकता यायला हवा,” तो म्हणाला.

एमआयच्या संघात कायरन पोलार्डसोबत वेळ घालवण्याबाबत सांगताना टिम डेव्हिड म्हणाला की आपल्याला सामन्यांप्रति दृष्टीकोन कसा असायला हवा हे त्याच्याकडून शिकता येते.

“पॉलीने आपल्या करियरमध्ये खूप उतार चढाव पाहिले आहेत. तो खेळत असलेले आक्रमक क्रिकेट मला खूप आवडते. तो खूप वेळ देतो. फक्त पॉवर हिटिंग आणि मधल्या फळीत फलंदाजीबद्दल, कठीण परिस्थितीत शांत कसे राहायचे, टाटा आयपीएलमध्ये कशाचा उपयोग होतो आणि सामन्यांसाठीची तयारी आणि नेट्समधला सराव, तुम्हाला किती करण्याची गरज आहे, दोन किंवा तीन महिन्यांच्या स्पर्धेच्या आणि संपूर्ण वर्षभर तुम्ही खेळत असल्याच्या कालावधीत स्वतःला ताजेतवाने कसे ठेवायचे अशा अनेक गोष्टी तो सांगतो,” डेव्हिड म्हणाला.

पॉलीसोबतची तुलना, त्यांच्या एकसारख्या जबाबदाऱ्या आणि स्टाइल्स या सर्व गोष्टी अटळ होत्या. पण डेव्हिडने आपण नवीन पॉली होऊ शकतो याची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले.

“कौतुक होणे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मी स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करतो. पॉली अनेक वर्षांपासून खेळतो. मी फक्त त्याच्याकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केलाय,” डेव्हिड म्हणाला.

टिम डेव्हिडने अत्यंत मुद्देसूद आणि प्रामाणिक उत्तरे दिली. त्यातून त्याचा दृढनिश्चय दिसतो. त्याची प्रगती पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.