INDvENG, पाचवा टी२०आय: भारताने मालिका ४-१ ने जिंकली आणि अभिषेककडून वानखेडेवर रेकॉर्ड्सची जंत्री!
आपल्याला हव्या त्या प्रकारे मालिका आता संपलेली आहे! 💥
टी२०आयचा शेवटचा सामना कसा झाला हे एका थोडक्यात सांगायचे झाल्यास फक्त एकच नाव सांगता येईल- ते म्हणजे अभिषेक शर्मा.
त्याने सात चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने ज्या ५४ चेंडूंमध्ये १३५ धावा फटकावल्या आहेत ना, त्या बघून सगळ्यांनीच आ वासला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला २४७/९ ची धावसंख्या उभारण्यात या धावांची खूप मदत झाली.
त्यानंतर आपल्या गोलंदाजांनी या धावसंख्येचा उत्तमरित्या बचाव केला आणि आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. चला तर मग आमच्या मुंबईत झालेल्या रेकॉर्डब्रेक खेळाचा आनंद घेऊया.
अभिषेक शर्मा अक्षरशः तुटून पडला!
आपल्याला याची अपेक्षा होती का? कदाचित. आपण त्याला तयार होतो का? अर्थातच! 🤯
आज तो आपल्या भात्यात फक्त चौकार आणि षट्कार ही दोनच अस्त्रे घेऊन निघाला होता का असा प्रश्न पडायला वाव आहे.
कुठल्याही प्रकारचा चेंडू असूदे, तो अक्षरशः शून्य मिनिटात सीमारेषेपलीकडे जात होता.
या २४ वर्षीय खेळाडूने एक भलामोठा षट्कार ठोकून फक्त १७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने तीन चौकार आणि पाच मोठे षट्कार ठोकले. भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगवान अर्धशतक करणारा हा दुसराच खेळाडू ठरला.
या दरम्यान भारतीय संघाने तब्बल ९५/ १ अशी टी२०आयमधील सर्वाधिक पॉवरप्ले धावसंख्याही नोंदवली.
शर्माजी अवघ्या काही मिनिटांत ५० वरून १०० वर!
त्याच्या हातात आज बॅट होती की दांडपट्टा होता तेच कळत नव्हते.
त्याचे अर्धशतक ट्रेलर म्हणावे तर त्याचे शतक तर ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला.
या डावखुऱ्या फलंदाजाने इंग्लिश गोलंदाजांना मैदानात शब्दशः लोळवले. त्याने मशीनगनसारख्या धावा करायला सुरूवात केली आणि फक्त ३७ चेंडूंमध्ये शतकी कामगिरी केली. हे देखील रोहित शर्मानंतर भारतासाठी टी२०आयमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेगवान शतक ठरले.
त्याचा स्ट्राइक रेट २००+ होता. त्यामुळे विरार ते चर्चगेट फास्ट लोकल स्टेशन सोडून वानखेडेवर आली की काय अशी शंका वाटू लागली. 🚉
शंभर धावा पूर्ण केल्यानंतर त्याने आणखी दोन विक्रम नोंदवले- टी२०आय मध्ये कोणत्याही भारतीयाने नोंदवलेली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या (१३५) आणि टी२०आय इनिंगमध्ये भारतीयाने केलेले सर्वाधिक षट्कार (१३). ⬇️
हा दिवस अभिषेकच काय अख्खा भारत कधीच विसरणार नाही आणि शर्माजींचे नावही इंग्लंडचा संघ विसरणार नाही. 👏
फक्त १५.३ ओव्हर्समध्ये भारताच्या 200 🆙
आपला तिलक वर्मा (१५ चेंडूंमध्ये २४) शिवम दुबे (१३ चेंडूंमध्ये ३० धावा) यांच्यामुळे आपल्याला १६ व्या ओव्हरमध्ये २०० धावा करता आल्या.
अर्थात क्रेडिट आपल्या या महान ओपनरला जाते. त्याने ऐतिहासिक शॉट्स मारून स्टेडियमवर आतषबाजी केली आणि भारतीय क्रिकेट टीमला आपल्या २० ओव्हर्समध्ये २४७/९ अशी दणदणीत धावसंख्या उभारता आली.
फिल सॉल्ट- इंग्लंडचा एकांडा शिलेदार!
या अविस्मरणीय मालिकेतही या उजव्या हाताच्या फलंदाजाला फटकेबाजी करण्यापासून कोणाला रोखता आले नाही. त्याने २३ चेंडूंमध्ये ५५ धावा करून शिवम दुबेच्या हातात शेवटी विकेट दिली.
दुसऱ्या बाजूला वारंवार विकेट्स पडत असल्यामुळे टीम इंडियाला मालिका गुंडाळायला फारसा वेळ लागला नाही.
एकतर्फी सामना = १५० धावांनी विजय!
जो बटलरच्या नेतृत्वाखालील संघ धावांचा पाठलाग करताना स्थिरावल्यासारखा वाटलाच नाही. त्याने खूप प्रयत्न केले परंतु ते सर्व पाण्यात गेले.
अभिषेख शर्मा आणि शिवम दुबे यांच्या अष्टपैलू गोलंदाजीमुळे <हो, हो, अगदी बरोबर वाचताय तुम्ही!!>, आपला आजचा दिवस चांगला गेला. आपण शेवटच्या सामन्यात वर्चस्व गाजवून मालिका आपल्याकडे आणली. 😎
थोडक्यात धावसंख्या: भारताकडून २४७/९ (अभिषेक शर्मा १३५, ब्रायडन कार्स ३/३८) कडून इंग्लंडचा १५० धावांनी पराभव इंग्लंड ९७/१० (फिल सॉल्ट ५५, मो. शामी ३/२५).