SRH vs MI: मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादचा पराभव. विजयी वारूवर स्वार

बुधवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२५ चा ४१ वा सामना खेळवण्यात आला. जिथे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार हार्दिक पंड्याचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी केली, परंतु संघाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. ट्रेंट बोल्टने ट्रॅव्हिस हेडला खाते न उघडता नमन धीरकडे झेलबाद केले.

यानंतर, इशान किशन फलंदाजीसाठी आला आणि अभिषेक शर्मासह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु दीपक चहरने किशनला जास्त काळ टिकू दिले नाही आणि त्याला यष्टिरक्षक रायन रिकेलटनकडून झेलबाद केले.

तिसरी विकेटही लवकर पडल्याने हैदराबादची स्थिती आणखी बिकट झाली. अभिषेक शर्मा फक्त ८ धावा काढून बोल्टच्या चेंडूवर विघ्नेश पुथूरकडे झेलबाद झाला. यजमान संघाचा चौथा बळी लवकरच गमवावा लागला. नितीश रेड्डीला केवळ २ धावांवर दीपक चहरने बाद केले.

यानंतर हेन्रिच क्लासेन आणि अनिकेत वर्मा यांनी खेळ सावरायचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने अनिकेतला १२ धावांवर बाद करून हैदराबादला पाचवा झटका दिला.

मुंबई इंडियन्सच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर हैदराबादची फलंदाजी तग धरू शकली नाही.

हैदराबादने निर्धारित २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावून १४३ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने ७१ धावांची शानदार खेळी केली, तर अभिनव मनोहरने ४३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सुंदर गोलंदाजी केली आणि ४ विकेट्स घेतल्या. दीपक चहरनेही दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.

मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टनने झाली, परंतु लवकरच संघाला पहिला धक्का बसला. जयदेव उनाडकटने रायन रिकेलटनला फक्त ११ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर विल जॅक्स फलंदाजीला आला.

रोहित शर्मा आणि विल जॅक्स यांनी डावाची जबाबदारी घेतली आणि तो पुढे नेला. दोघेही उत्तम लयीत होते आणि आठ ओव्हर्सनंतर मुंबईची एक बाद ६९ धावा झाल्या होत्या.

या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये होता आणि त्याने ६९ चेंडूत ७० धावांची शानदार खेळी केली, तर विल जॅक्सने २२ धावांचे योगदान दिले आणि सूर्यकुमार यादव ४० धावांसह नाबाद राहिला.

अशा रितीने एमआयने एसआरएचला ७ विकेट्सनी जबरद्स हरवले आणि ही धावसंख्या फक्त १५.४ ओव्हर्समध्येच पूर्ण केली.

एमआयचा हा सलग चौथा विजय होता. टीम आता पाच विजयांसह पॉइंट टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना २७ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध असेल.

 

थोडक्यात धावसंख्या

सनरायझर्स हैदराबाद: (२० ओव्हर्समध्ये १४४/८); हेनरिक क्लासेन ७१, ट्रेंट बोल्ट ४/२६

मुंबई इंडियन्स: (१५.४ ओव्हर्समध्ये १४६/३); रोहित शर्मा ७०, जयदेव उनादकट १/२५