सादर आहे… जसप्रीत बुमरा, आयसीसी प्लेयर ऑफ दि मंथ डिसेंबर २०२४!

जसप्रीत जसबीरसिंग बुमरा – आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ दि मंथ फॉर डिसेंबर २०२४! हा किताब त्यालाच मिळणार याची कायम खात्री होती. शंका तर नव्हतीच कधी.

आपल्या बूमने ऑस्ट्रेलियात बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये ऑसी कर्णधार पॅट कमिन्स आणि प्रोटीआजचा डेन पॅटरसन यांच्या तगड्या विरोधाला न जुमानता महिनाभर धमाल केली. 

आपल्याला अपेक्षा होती त्याप्रमाणे जस्सीभाईने त्याच्या नावासमोरचा “सामना पालटणारा खेळाडू” टॅग कायम ठेवला. भारतीय जलदगती गोलंदाजांच्या या नेतृत्वाने पाच कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी ३२ विकेट्स घेतल्या. भारताने कसोटी मालिकेत केलेल्या या सर्वाधिक विकेट्स ठरल्या.

फक्त १४.२२ च्या सरासरीने बुमराने मागच्या महिन्यात ३२ पैकी २२ विकेट्स घेतल्या. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ६/७६ अशी कामगिरी तर मेलबर्नमध्ये ५/५७ विकेट्स. त्याचा हा परफॉर्मन्स अनेक वर्षे लक्षात ठेवला जाईल. कारण तो तसाच झक्कास होताच!

पण हे एवढ्यावरच थांबले नाही पलटन. बूमने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आपल्या “डोकेदुखी”ला घरी पाठवून आपली २०० वी कसोटी विकेट नोंदवली.

कसोटी सामन्यांच्या इतिहासात २० पेक्षा कमी सरासरीने २०० विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. बरोबर वाचलंत तुम्ही. त्याने वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज माल्कम मार्शलचा विक्रम मागे टाकला. किती मस्त ना!

आपल्या जसप्रीत बुमराचे क्रिकेट जगाने कसे कौतुक केले ते पाहूया!