कॅप्टन हार्दिक बोलतोय: रोहित, एमआय कर्णधारपद, दुखापती आणि इतर बरेच काही

उत्साह, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. हार्दिक पंड्या सीझनपूर्वीच्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरसोबत सोमवारी (१८ मार्च) पत्रकारांना सामोरा गेला.

एमआयच्या नवीन कर्णधाराने सर्वप्रथम ब्लू अँड गोल्ड, मुंबई आणि वानखेडेवर परतणे म्हणजे काय याबाबत आपले पहिले मत व्यक्त केले.

“जिथून सुरूवात झाली तिथे परत आल्यावर मला खूप छान वाटते आहे. अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे २०१५ पासून ते आतापर्यंत मी जे काही शिकलो ते सर्व या टीमच्या माध्यमातून आणि या प्रवासातून शिकलो आहे. मी २०१५ मध्ये प्रथम खेळायला उतरलो तेव्हापासून माझे संपूर्ण आयुष्य बदलले. हा एक स्वप्नातीत प्रवास होता कारण मी इथपर्यंत पोहोचेन असे मला वाटलेही नव्हते. परंतु पहिल्या दिवसापासून माझे आवडते मैदान असलेल्या ठिकाणी मी परतलो आहे आणि माझ्या आवडत्या टीमसोबत खेळणार आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

त्याच्या नवीन जबाबदारीबाबत …

“फारच भारी वाटतेय, आणि का वाटू नये? मी माझा प्रवास इथून सुरू केला आणि दहा वर्षांनंतर मी या टीमचे नेतृत्व करत असेन असा विचार स्वप्नातदेखील केला नव्हता. ही भावना सुखावणारी आहे. मी या सीझनसाठी आणि ज्या जुन्या खेळाडूंसोबत खेळत होतो त्यांच्यासोबत खेळायला खूप उत्सुक आहे. आम्ही एकत्र खूप यशदेखील पाहिले आहे.”

या कर्णधारपदामुळे त्याच्या आणि रोहित शर्माच्या नात्याबाबत अनेक प्रश्न विचारले गेले. परंतु हार्दिकने त्यांना उत्तरे दिली.

“आमचे नाते कधीही बदलणार नाही कारण मला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तो सोबत असेलच. या वेळी तो (रोहित) भारतीय कर्णधार असल्यामुळे मला मदत होतेय कारण या टीमने त्याच्या हाताखाली प्रचंड यश मिळवलेले आहे. त्याने ज्या सर्वांची सुरूवात केली होती ते सर्व मी इथून पुढे नेणार आहे. मी संपूर्ण एमआय करियरमध्ये त्याच्या हाताखाली खेळलेलो असल्यामुळे काहीही वेगळे किंवा विचित्र वाटणार नाही. मला माहीत आहे की संपूर्ण सीझनमध्ये त्याचा हात माझ्या खांद्यावर नक्कीच असेल.”

चाहत्यांच्या वेगवेगळ्या भावनांबद्दल प्रश्न विचारला गेला. त्याचे उत्तर हार्दिकने अगदी मनापासून आणि स्पोर्टिंग पद्धतीने दिले.

"मी चाहत्यांची नाराजी समजू शकतो, त्यांचा आदर करतो. परंतु त्याचवेळी मी खेळावर लक्ष केंद्रित करतो. मी ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो त्यावर ठेवतो. मला जे नियंत्रणात ठेवता येणार नाही त्यावर मी लक्ष केंद्रित करत नाही. तसेच आम्ही चाहत्यांचे खूप आभारी आहोत कारण नाव, प्रसिद्धी आणि प्रेम त्यांच्याकडूनच येते. त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि मी त्यांच्या मताचा आदर करतो. परंतु, त्याचवेळी मी खूप उत्साहात आहे आणि खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करेन," असे तो म्हणाला.

विश्वचषक झाल्यापासून त्याला मैदानाबाहेर ठेवणाऱ्या दुखापतीनंतर पुन्हा खेळण्यासाठी आपण खूप आतुर असल्याचे त्याने सांगितले.

"माझी विश्वचषक (२०२३) मधली दुखापत दुर्दैवी होती आणि पूर्वीच्या दुखापतींपेक्षा वेगळी होती. तिचा माझ्या फिटनेसशी काहीही संबंध नव्हता. मी एक बॉल थांबवायचा प्रयत्न करत होतो आणि माझा घोटा मुरगळला. थोडक्यात, मी दीड महिन्यांनी परत येऊ शकलो असतो. परंतु मी दुखापतग्रस्त झालो तेव्हा पहिल्या दिवसापासूनच मला कळले होते की विश्वचषकातून बाहेर जाणार होतो."

"भारतासाठी आणि तेही विश्वचषकात खेळणे ही कायमच खास गोष्ट आहे. आम्ही दहा दिवस प्रयत्न केले, पण आम्हाला माहीत होते की सेमीफायनल किंवा फायनलला फिट होणे ही कठीण गोष्ट होती. मी स्वतःला पुढे ढकलून माझी दुखापत वाढवून घेतली आणि ती दीर्घकाळ चालली. मी फिट झालो तेव्हा भारत विरूद्ध अफगाणिस्तान मालिका सुरू झाली होती. त्यामुळे मी तेव्हापासूनच फिट होतो परंतु सामनेच उपलब्ध नसल्यामुळे पुनरागमनाच्या संधीही नव्हत्या."

त्यानतंर मार्क बाऊचरला नवीन टीम रचनेबाबत विचारण्यात आले- क्लास ऑफ २०२४ चे आगमन आणि विशिष्ट परिस्थिती मोडण्यासाठी कृती.

“बदल झाल्यामुळे नवीन आव्हाने आणि दृष्टीकोन येतो. ही चांगली गोष्ट आहे आणि ती ताजेपणा आणते. आमच्याकडे शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही खेळाडूंची नवीन बॅच आहे. काहीजण आयपीएलमध्ये प्रथमच खेळणार आहेत. आम्हाला सीझन चांगल्या प्रकारे सुरू करायचा आहे. सध्या मी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्पर्धा चांगल्या प्रकारे सुरू न करण्याचा आमचा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही त्यावर उपाय काढला आहे. संघामध्ये पहिल्या सामन्यासाठी जास्त तयार राहण्याच्या आणि चांगली सुरूवात करण्याच्या दृष्टीने एखाद दोन गोष्टी सापडतील असे आम्हाला वाटते. परंतु खेळाडूंवर ताण आणणार नाही. आम्ही चांगली सुरूवात केली तर हरकत नाही. आम्हाला स्वतःवर थोडंसं काम करावं लागेल. सुदैवाने आम्ही मागच्या आठवड्यात आणि आगामी कालावधीत आम्ही केलेल्या उपाययोजनांमधून चांगले निकाल येतील आणि स्पर्धा उत्तमरित्या सुरू करता येईल असे आम्हाला वाटते”

हा आत्मविश्वास आणि एमआय जिंकण्याची मेंटॅलिटी यांसोबत पलटन आपल्या लाडक्या ब्लू अँड गोल्डकडून कर्णधार हार्दिक, लॉर्ड कायरन पोलार्ड (फलंदाजी प्रशिक्षक) आणि परतलेला लसिथ मलिंगा (गोलंदाजी प्रशिक्षक) यांच्या हाताखाली ट्रॉफी क्रमांक ६ साठी जिवाचे रान केले जाईल अशी आशा करू शकतात. तर कमेंट बॉक्स भरून टाका आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते आम्हाला सांगा.