MI Junior Rising Star 2025 final: मुलांमध्ये क संघाला विजेतेपद; शौर्य पाटील व वेदांत बनेची शतकी सलामी निर्णायक

शौर्य पाटील (नाबाद 80) व वेदांत बने यांच्या (नाबाद 79) नाबाद शतकी सलामीच्या जोरावर अ संघाचा 10 विकेट राखून पराभव करताना क संघाने मुंबई इंडियन्स ज्युनियर बॉईज रायझिंग स्टार स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मुली गटाच्या एकतर्फी अंतिम लढतीत क संघावर 119 धावांनी मात करत अ संघाने ट्रॉफी जिंकली.

मुलांच्या फायनलमध्ये, प्रथम फलंदाजी करताना अ संघाने 40 षटकांत 8 बाद 166 धावा केल्या. दुसऱ्या षटकात दोन्ही सलामीवीर गमावले तरी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार अब्दुर रहमानने (34 धावा) प्रणव अय्यंगारसोबत (28) संयमी 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत  डाव सावरला.

त्यानंतर क संघाकडून युवान शर्मा (4 विकेट्स) आणि निषाद परबने (3 विकेट्स) प्रतिस्पर्ध्यांची अवस्था 8 बाद 96 धावा अशी केली. मात्र, तळातील जश्मित सिंग (नाबाद 32) आणि अनुज सिंगने (नाबाद 29) नवव्या विकेटसाठी 79 धावांची नाबाद भागीदारी रचताना अ संघाला दीडशेपार नेले.

168 धावांचे माफक आव्हान क संघाने 18.3 षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. शौर्य पाटीलने सर्वाधिक नाबाद ८० आणि वेदांत बनेने ७९ धावा फटकावताना नाबाद शतकी सलामी देत संघाला मोठ्या फरकाने जिंकून दिले.

मुलींच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार तनिषा शर्माचे (108 धावा) धडाकेबाज शतक आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या अशिरा पाटीलच्या (96 धावा) तडाखेबंद खेळीमुळे अ संघाने 21 षटकांत 2 बाद 242 धावांचा डोंगर रचला.

ब संघाला मोठे आव्हान पेलवले नाही. ब संघाला निर्धारित 21 षटकात 4 बाद 123 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून वैदई तानावडे (45) आणि स्वरदा बेंडेने (32) थोडा प्रतिकार केला.

संक्षिप्त धावफलक:

मुले: अ संघ - 40 षटकांत 8 बाद 166(अब्दुर रहमान 34, जश्मित सिंग नाबाद 32, अनुज सिंग नाबाद 29, प्रणव अय्यंगार 28; युवान शर्मा 4/21, निषाद परब 3/30) पराभूत वि. क संघ - 18.3 षटकांत बिनबाद 167(शौर्य पाटील नाबाद 80, वेदांत बने नाबाद 79)

मुली: अ संघ - 21 षटकांत 2 बाद 242(तनिषा शर्मा 108, अशिरा पाटील 96) विजयी वि. ब संघ - 21 षटकांत 4 बाद 123 (वैदई तानावडे 45, स्वरदा बेंडे 32)