रोहित भाई नेहमीच म्हणतो की तुमच्या खेळाचा आनंद लुटा, सकारात्मक गोष्टी तुमच्यापाशी येतील: तिलक वर्मा

मुंबई इंडियन्सचा तरुण धडाकेबाज फलंदाज आपला कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी वरील उद्गार काढतो. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम आतापर्यंतचा सर्वाधिक आव्हानात्मक ठरला आहे. अशा मोसमात पाच वेळच्या विजेत्या संघात भविष्यासाठी मुख्य कथा म्हणून तिलक वर्मा याचा उदय झाला आहे.

मुंबई इंडियन्सला गवसलेला हा एक चमकता हिरा आहे, ज्याला पैलू पाडले जात आहेत. मुंबई इंडियन्सची संघ संस्कृती आणि येथील लोक त्याच्या भोवती असणे सुद्धा फायद्याचे ठरले आहे. रोहित, मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने आणि क्रिकेट उपक्रम संचालक झहीर खान तसेच इतर सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आहे. अद्याप विशी पार न केलेल्या खेळाडूच्या आसपास फारच ज्येष्ठ असल्यासारखे यावरून वाटत असेल तर त्याच्याइतकाच तरुण असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हीस याच्याकडे बघता येईल. अनुभव आणि व्यक्तीमत्त्व यांच्या बाबतीत असे वैविध्य असण्याचा विलक्षण परिणाम तिलकवर झाला आहे.

रोहित शर्मा याच्या क्रिकेटच्या तत्त्वज्ञानाचा त्याने अगदी मनापासून अवलंब केला आहे. योगायोग म्हणजे पदार्पणाची कॅप त्याला कर्णधाराच्याच हस्ते प्रदान करण्यात आली.

तिलक म्हणाला की, “मला रोहित भाई नेहमीच आवडायचा. त्यामुळे त्याच्याकडून कॅप मिळाली तेव्हा मला स्फूरण चढले आणि आत्मविश्वास लाभला. मी कोणत्याही परिस्थितीत दडपण घेता कामा नये असे तो मला सांगत असतो. तो म्हणतो की तू ज्या पद्धतीने आनंद लुटतो आहेस आणि खेळतो आहेस, तसेच करीत राहा. तू तरुण आहेस. आनंद लुटण्याची हीच वेळ आहे. तू ती कधी गमावलीस तर ती परत मिळणार नाही. त्यामुळे तू जेवढा जास्त आनंद लुटशील तेवढ्या सकारात्मक गोष्टी तुझ्यापाशी येतील. तुला एखाद्या दिवशी वाईट वाटले, दडपण आले आणि सामना मनासारखा झाला नाही तर पुन्हा चांगल्या स्थितीत येण्यासाठी तुला वेळ मिळणार नाही. त्यामुळे तू तुझ्या खेळाचा आनंद लूट. वाईट दिवस येतील, तसे चांगले दिवस सुद्धा येतील.”

“या घडीला मुंबई इंडियन्ससाठी काहीसा उतरता टप्पा सुरु आहे. आम्ही चांगला खेळ करतो आहोत, पण काही छोट्या चुकांमुळे सामने गमावत आहोत. आता असे असूनही रोहित मला सांगतो की मी खरोखरच चांगली कामगिरी करतो आहे आणि मला कशातही बदल करण्याची गरज नाही. तो मला असे सांगतो तेव्हा फार छान वाटते.”

“त्याने मला नेहमीच आनंद लुटण्यास सांगितले आहे आणि मी कायम लक्षात ठेवतो अशी ही गोष्ट आहे. ही गोष्ट एकूणच माझ्या आयुष्यातही माझ्याबरोबर राहील. आणि तिचा फायदा सुद्धा होतो आहे. मी चांगली सुरुवात केली आहे, ती यामुळेच.”

फलंदाजीच्या तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन घ्यायचे असेल तर जयवर्धने यांच्यापेक्षा दुसरा सरस कुणी नाही, मात्र मुख्य प्रशिक्षकांच्या बाबतीत मुद्दा केवळ तंत्रापुरता मर्यादीत नसतो.

“ते माझ्या फलंदाजीविषयी बोलतात आणि सूचना देतात,” असे सांगून तिलक पुढे म्हणाला की, “मी एखादा फटका खेळत असेन आणि एखाद्या सामन्यात तो मारताना बाद झालो, तर ते मला सांगतात की, पुढील सामन्यात तोच फटका मारण्यापासून स्वतःला रोखू नकोस. याचे कारण तो फटका मला धावा मिळवून देणारा आहे, त्यामुळे तो मारताना मी बाद सुद्धा होऊ शकतो, पण त्याच फटक्यामुळे धावा सुद्धा मिळतील. ते एखाद्या खेळाडूला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवतात.

रोहितमुळे व्यक्तीमत्त्व आणि आत्मविश्वास वाढत असेल आणि जयवर्धने यांच्यामुळे फलंदाजीच्या शारिरीक आणि मानसिक बाबी भक्कम होत असतील तर जाणीव, धोरण आणि रणनिती या बाबी बिंबविण्याची मदार झहीर यांच्यावर येते.

“ ते मला सांगतात की प्रत्येक सामन्यातील आसपासच्या परिस्थितीची जाणीव ठेव. प्रत्येक संघ वेगळा असतो, प्रत्येक गोलंदाज वेगळा असतो, डावपेच वेगळे असतात आणि खेळपट्टी सुद्धा वेगळी असते. आपण त्याच मैदानावर खेळत असलो तरी दुसऱ्या दिवशी वारा वेगळा असतो. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे आणि कल्पनाचित्र रंगविणे, जेणेकरून तुम्ही लवकर जुळवून घेऊ शकाल असा सल्ला ते देतात. तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेतले तर त्यातून मार्गक्रमण करणे सोपे जाते. तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही, परिस्थिती कशी हाताळायची याचे विचार तुम्हाला आपोआप सुचतात.

तिलकने मैदानाबाहेर ब्रेव्हीस याच्याशी भक्कम मैत्री निर्माण केली आहे.

“आम्ही दोघे मैदानाबाहेर सुद्धा एकमेकांच्या जवळ आहोत,” असे सांगून तो म्हणाला की, आम्हा दोघांचे वय सारखे असल्यामुळे आमचे लवकर जुळते. तो नेहमी माझ्या खोलीत असतो. आम्हाला कुठे जायचे असेल तर आम्ही एकत्र जातो. आता आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो आहोत की आम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर सुद्धा एकमेकांना खूप चांगले ओळखतो. त्यामुळे सामन्यात त्याच्याबरोबर फलंदाजी करणे फार सोपे बनते. आमच्यातील समन्वय उत्तम आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांकडे जातो आणि काही चुकत असेल तर तसे सांगतो. सामन्यात त्यामुळे फार सोपे जाते. आणि जेव्हा तुम्ही मैदानावर चांगली कामगिरी करीत असता, तेव्हा मैदानाबाहेरील नाते आपोआप घट्ट होत जाते.”

मैदानावरील आव्हानांचा आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायजीला सामना करावा लागला आहे. मैदानाबाहेरील वातावरण मात्र अगदी भक्कम असल्यामुळे भविष्याची बीजे रोवली गेली आहेत, जी चमकदार आहेत.