स्कायच्या दमदार खेळामुळे भारताचा झिम्बाब्वेवर विजय

टी२० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ मधील शेवटच्या सामन्यात भारताने मेलबर्न येथील भरगच्च क्रिकेट मैदानावर झिम्बाब्वेवर जोरदार विजय मिळवला. सूर्यकुमारचा तगडा खेळ आणि अत्यंत सुंदर गोलंदाजीमुळे हा विजय शक्य झाला.

स्कायने पुन्हा एकदा या सर्वांत मोठ्या व्यासपीठावर आपला ठसा उमटवला. त्याने गोलंदाजांचा तर धुव्वा उडवलाच पण त्याचबरोबर अर्धशतक फटकावून भारताची धावसंख्या १८६/५ वर नेऊन पोहोचवली.

चेंडू खूप हलत असतानाच्या काळात मोहम्मद शामीने चेंडूने जोरदार हल्ला चढवला. रवीचंद्रन अश्विनने शेवटच्या टप्प्यात एकामागून एक विकेट्स घेतल्या आणि शेवटी भारताला तब्बल ७१ धावांनी विजय मिळवणे शक्य झाले.

राहुलचे आणखी एक अर्धशतक

नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यावरही पॉवर प्ले चांगल्या प्रकारे खेळला. सुरूवातीच्या टप्प्यात झिम्बाब्वेने खूप अचूक गोलंदाजी केली. पण विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अत्यंत शांतपणे हल्ले परतावून लावत भारताला पॉवरप्लेमध्ये ४६/१ वर आणून ठेवले.

त्यानंतर केएल राहुलने आपली बॅट सैल सौडली आणि चेंडूला सातत्याने षटकार आणि चौकार मारून सीमारेषेपलीकडे पाठवले. अत्यंत क्लासी अशा आपल्या इनिंगमध्ये भारतीय सलामी फलंदाजाने या टी२० विश्वचषक मालिकेत दुसऱ्यांदा आपले अर्धशतक पूर्ण केले.

राहुलने सहा षटकार ठोकून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि टीमला शेवटच्या सुपर १२ सामन्यात वर्चस्व गाजवायची संधी दिली.

बर्लने फलंदाज रोखले

भारतीय संघ खेळ पूर्णपणे ताब्यात घेणार असे दिसत असतानाच झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू रायन बर्लने वेगाला खीळ घातली. सीन विल्यम्सच्या गोलंदाजीवर बर्लने अत्यंत सुंदर कॅच पकडून विराट कोहली आणि ऋषभ पंतला बाद केले आणि सिकंदर रझाने राहुलला बाद करून भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले.

८७/१ ते १०१/४ पर्यंत पोहोचताना भारताने तीन विकेट्स गमावल्या आणि १४ चेंडूंमध्ये फक्त १६ धावा केल्या. मोठीच अडचण झाली!

एकच वादा, सूर्या दादा

जेव्हा जेव्हा भारत अडचणीत सापडतो तेव्हा एक खेळाडू समोर येतो आणि सर्व बाजू पलटवून लावतो. भारताचा या वर्षातील टी२० आयमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेल्या सूर्यकुमार यादवने रविवारी एमसीजीवर आपल्या नेत्रदीपक खेळाने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले.

आपल्या भात्यातल्सा सर्व अस्त्रांचा वापर त्याने या इनिंगमध्ये केला- फ्लिक्स, स्कूप्स (आणि बरेच स्कूप्स) आणि ड्राइव्ह्ज- स्कायने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले आणि क्षेत्ररक्षकांना घाम फोडला. पंतची विकेट पडल्यानंतर खेळ संथ झाला होता. पण सूर्यकुमार यादवने सामना पलटवत तो अविस्मरणीय बनवला.

सूर्यकुमार यादवने २५ चेंडूंमध्ये ६१ धावा अक्षरशः कुटल्या. त्याने भारतीय धावसंख्या १८६/५ वर नेली. टी२० विश्वचषकात भारताने केलेले हे चौथ्या क्रमांकाचे सर्वांत वेगवान अर्धशतक होते.

महत्त्वाचा टप्पा! टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

भारतीय जलदगती गोलंदाजांचे वादळ

धावांचा पाठलाग करत असताना चेंडू सुरूवातीला जलदगती गोलंदाजांना साथ देत होता. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शामी आणि हार्दिक पंड्या यांनी झिम्बाब्वेला सावरण्याची संधी देण्यापूर्वीच त्यांची इनिंग गुंडाळून टाकली.

भुवनेश्वर आणि अर्शदीप यांनी आपल्या पहिल्या ओव्हर्समध्ये विकेट घेतली. अत्यंत सुंदर सुरूवात केल्यानंतर शामीने झिम्बाब्वेच्या मधल्या फळीला खिंडार पाडून त्यांच्यासाठी समस्या निर्माण केल्या. त्यानंतर पंड्यादेखील त्यांच्यासोबत आला. त्याने कर्णधार क्रेग एर्विनला बाद केले आणि झिम्बाब्वे मधल्या टप्प्याला पोहोचेपर्यंत ५९/५ वर होते.

अश्विनच्या स्पिनमुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत

रायन बर्लने प्रतिहल्ला सुरू केला तेव्हा बराच उशीर झाला होता. पण त्यामुळे झिम्बाब्वेला मानाने खेळ संपवता आला. त्याने रझासोबत केलेल्या ६० धावांच्या भागीदारीमुळे फक्त अपयश लांबणीवर टाकले गेले. त्यानंतर अश्विनने बर्लसह झिम्बाब्वेच्या खालच्या तळातील फलंदाजांना साफ केले. त्याने चार ओव्हर्समध्ये तीन विकेट्स घेतल्या आणि फक्त २२ धावा दिल्या. जोरदार खेळला!

आता ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली रोहित आणि कंपनी गुरूवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी एडलेडवर टी२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. चला, पलटन! आता ट्रॉफी जिंकायला फक्त दोनच सामने शिल्लक आहेत.

थोडक्यात आकडेवारी: भारत १८६/५, २० ओव्हर्समध्ये (सूर्यकुमार यादव ६१*, सीन विल्यम्स २/९) झिम्बाब्वे ११५/१०, १७.२ ओव्हर्समध्ये (रायन बर्ल ३५, रवीचंद्रन अश्विन ३/२२). झिम्बाब्वेचा भारताकडून ७१ धावांनी पराभव.