या विजयामुळे संघात आणखी सकारात्मकता येईलः सूर्यकुमार यादव

कठीण परिस्थितीत आम्हाला १५९ धावांचा पाठलाग करणे शक्य करताना सूर्यकुमार यादवच्या ३९ चेंडूंमधील ५१ धावांचा मोठा हातभार लागल्यामुळे त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.

या सीझनमधील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते आणि सर्वोत्तम होते कारण टीमच्या पहिल्या विजयासाठी त्याचा खूप उपयोग झाला. स्कायच्या मते त्याने आपली भूमिका उत्तमरित्या निभावली.

“तिसऱ्या क्रमांकावर माझे काम रोहितने जिथे सामना सोडला होता तिथून पुढे नेण्याचे होते. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हा एक महत्त्वाचा विजय आहे आणि इथके वातावरणही चांगले आहे. मला सर्व स्थानांवर फलंदाजीचा आनंद मिळतो. परंतु तिसऱ्या क्रमांकावर खेळायला मला जास्त आवडते कारण त्यामुळे माझ्या इनिंग्सचा वेग वाढतो,” त्याने सामन्यानंतर सांगितले.

स्कायने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही उपस्थिती लावली आणि विजयामुळे कॅम्पमध्ये सकारात्मक मूड निर्माण होईल असे त्याला वाटले.

“या विजयामुळे आणखी सकारात्मकता वाढेल. आम्ही नेट्समध्ये आणि टीमच्या डिनरच्या वेळी एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेत होतो. त्यामुळे या सीझनमध्ये सर्वांनाच पुढे जाताना शिकण्यास मदत होईल,” असे स्काय म्हणाला.

तरूण तिलक वर्माने मधल्या स्थानावर आणखी एक परिपक्व खेळी खेळली आणि सूर्यासोबत त्याने एक महत्त्वाची भागीदारी केली. सूर्याने त्याचे खूप कौतुकही केले.

“तिलक हा एक उत्तम खेळाडू आहे. तो नेट्समध्ये ज्या पद्धतीने मेहनत करतो आणि त्याला पुढे जायचे असते. त्यामुळे त्याच्यासारख्या कोणाला पाहणे खूप छान वाटते. आणखी काही वर्षांनी त्याला खेळताना पाहायला मला खूप आनंद होईल,” तो म्हणाला.

स्कायने युजवेंद्र चहलसोबतची एक गंमत सांगितली. युजवेंद्रने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले होते आणि अंपायरने ते नाकारले ही गोष्ट त्याने सांगितली.

“युझी आणि मी आम्ही दोघांनी जरा गंमत केली. तो एक खूप चांगला गोलंदाज आहे. आमच्या लुटुपुटूच्या लढायांची मला खूप मजा येते,” स्काय हसत म्हणाला.

संघाचा मूड खूपच चांगला आहे आणि आपण हा मूड सेलिब्रेट करणार असल्याचे स्कायने सांगितले आहे.

“मी वैयक्तिक कामगिरी कधीच साजरी करत नाही. टीम जिंकली तर मला आनंद होतो. मी पराभवात योगदान दिले तरी मी त्याला एक एकत्रित पराभव मानतो. आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. हा आमचा पहिला विजय आहे आणि आम्ही नक्कीच तो साजरा करू,” त्याने शेवटी सांगितले.

अनेक सुंदर परफॉर्मन्सेससोबत हा एक रोमहर्षक आणि उत्साहित करणारा विजय होता. आम्हाला आशा आहे की आगामी सामन्यांमध्येही याची पुनरावृत्ती होईल, पलटन!