आम्हाला पुढच्या सीझनमध्ये नेण्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेतः रोहित शर्मा

कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यानंतरच्या सीझनच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थिती लावली आणि पुढच्या वर्षात उपयोगी पडतील अशा शिकलेल्या बाबी आणि सकारात्मक गोष्टींवर चर्चा केली.

“हा सीझन आमच्यासाठी निराशाजनक होता कारण आम्ही सुरूवातीला अनेक गोष्टी योग्य केल्या नाहीत. टाटा आयपीएलमध्ये तुम्हाला पटकन वेग पकडावा लागतो. आम्ही आमच्या योजनांवर नीट अंमलबजावणी केली नाही आणि नवीन टीम आपल्या जबाबदाऱ्या समजून घेत असतानाच्या काळात हे घडते. परंतु आम्ही दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी केली,” रोहित म्हणाला.

“आम्ही सुरूवातीला थोडे गडबडलो आणि थोडे दुर्दैवीही ठरलो. या गोष्टी घडतात पण आपल्याला त्यातून बाहेर येऊन आपण तयार करत असलेल्या योजनांवर काम करावे लागते. ही टीम नवीन आहे आणि ते खेळत असलेल्या विविध टीम्समध्ये त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना जुळवून घ्यायला वेळ लागला. एकत्रित कामगिरीसह मागच्या सहा किंवा सात मॅचेस आमच्यासाठी सकारात्मक ठरल्या आणि या सीझनमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला त्याचीच गरज पडते. पुढच्या सीझनमध्ये जाताना आम्हाला हे शिकायला मिळाले आहे,” तो पुढे म्हणाला.

रोहितने स्वतःच्या खराब फॉर्मबद्दल सांगताना त्याने चांगली कमगिरी करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणार असल्याची हमी दिली.

“मी यापूर्वीही वाईट पॅचमधून गेलो आहे. अर्थात अजून माझ्याकडे खेळायला क्रिकेट खूप आहे आणि आता कशा प्रकारे यातून सर्वोत्तम पद्धतीने बाहेर येता येईल याचा मला विचार करायचा आहे. मी माझ्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी काम करेन आणि सर्वतोपरी प्रयत्न करेन,” तो म्हणाला.

आमचा सीझन संपत असताना काही गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे. अनेक सकारात्मक बाबी आणि अत्यंत चांगले तरूण टॅलेंट आमच्याकडे आहे. आम्हाला पुढच्या सीझनमध्ये याचा खूप चांगला फायदा होईल याची आम्हाला खात्री वाटते.