News

MI Junior Rising Star 2025: टीम डी संघाची टीम बीवर 6 विकेटनी मात

By Mumbai Indians

एमआय ज्युनियर रायझिंग स्टार मुंबई लेगच्या रंगतदार लीग सामन्यात सोमवारी टीम डी संघाने टीम बी संघावर 6 विकेटनी मात केली.

प्रत्येकी 23 षटकांच्या सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर आकाश मांगडेने (54 धावा) दमदार अर्धशतक झळकावताना आयुष शिंदेसोबत (19) तिसर्‍या विकेटसाठी केलेल्या 66 धावांच्या भागीदारीनंतरही अवघ्या 27 धावांत 7 विकेट पडल्याने टीम बी संघाचा डाव 21.1 षटकांत 107 धावांत आटोपला. शौनक गावडेने 18 धावांत 4 विकेट घेत त्यात प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. आयुष यादव (2/5) आणि आर्यन पुरोहितने (2/15) त्याला सुरेख साथ दिली.

प्रतिस्पर्ध्यांचे 108 धावांचे माफक आव्हान टीम डी संघाने 21.4 षटकांत 4 विकेटच्या बदल्यात पार केले. हर्षित बोबडे आणि शार्दुल फगरेने 57 धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. हर्षितने 43 धावा केल्या. आरव यादवने 11 धावांत 3 विकेट घेत सामन्यात रंगत आणली. मात्र,  कर्णधार अमोघ पाटीलच्या 26 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर टीम बी संघाने 1.5 षटके शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक:

मुले: टीम सी - 16.4 षटकांत 4 बाद 97(कृष उपाध्याय 28; दीक्षांत पाटील 2/20, अभिषेक पांडे 2/23) टीम ए - 24.2 षटकांत सर्वबाद 95 (निषाद परब 4/26, दक्ष चौरसिया 3/9, परिन दुबे 13/15).

टीम डी - 21.1 षटकांत 4 बाद 110(हर्षित बोबडे 43, अमोघ पाटील नाबाद 26; आरव यादव 3/11) विजयी वि. टीम बी - 20.1 षटकांत सर्वबाद 107(आकाश मांगडे 54; शौनक गावडे 4/18, आयुष यादव 5/2, आर्यन पुरोहित 2/15).