हा आमच्यासाठी खास अनुभव होताः एमआयसोबतच्या पहिल्या सीझनबद्दल डेवाल्ड ब्रेविस सांगतोय
आपल्या टाटा आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करताना पहिल्या फळीत फलंदाजी करून १६१ धावा काढल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आता मस्तपैकी सुट्टीवर आहे.
तो दक्षिण आफ्रिकेतल्या आपल्या घरी परतलाय. काही महिन्यांनी घरी परतल्यामुळे तो आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. त्याने क्रिकेट फॅनॅटिक्स या मॅगझीनसाठी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली आणि आमच्यासोबत टाटा आयपीएलमध्ये घालवलेल्या कालावधीबद्दल तो अत्यंत प्रेमाने बोलला.
हा अनुभव त्याच्यासाठी खूप खास होता आणि आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीमुळे मजा आली हे सांगणे त्याच्यासाठी कठीण ठरले.
“रोहित, ईशान आणि संपूर्ण टीमला माझे क्वारंटिन संपल्यावर भेटणे ही खूप खास गोष्ट ठरली. माझा पहिला सामना, इतक्या लोकांसमोर खेळणे हा अनुभव वेगळाच होता. जितका जास्त उत्साह तितका जास्त ताण वाढतो आणि मला हे खूप आवडते. एमआयसाठी खेळण्याचा ताण मला कधी जाणवलाच नाही. मला फक्त आठवते ती टीमसाठी आणखी एक ट्रॉफी मिळवण्याची प्रेरणा,” ब्रेविसने आपल्या मुलाखतीत सांगितले.
डीबीसाठी आणखी एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आपला बालपणीचा आदर्श सचिन तेंडुलकरला भेटणे ही होती आणि मास्टर ब्लास्टरला प्रथम पाहिले तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.
“मी जिमच्या जमिनीवर आडवा पडलो होतो आणि अचानक सचिन सर दारात आले. माझा तर स्वतःवर विश्वासच बसेना. मी त्यांच्याशी पहिल्यांदा हात मिळवला तेव्हा माझ्या अंगावर रोमांच आले. ते कायम माझा आदर्श होते आणि त्यांनी मला शिकवलेल्या छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी मला खूप खास वाटत होत्या. त्यांच्याकडून आणि महेला अशा महान खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब ठरली,” ब्रेविस म्हणाला.
एमआयमधली सपोर्ट टीम- महेला जयवर्धने, झहीर खान, रॉबिन सिंग, शेन बॉन्ड यांनीही या किशोरवयीन खेळाडूला आपला सराव चांगल्या प्रकारे नियोजित करायला शिकवले आणि मानसिक आरोग्याचेही महत्त्व त्याला शिकवले.
“एमआयचा सेटअप खूप छान आहे कारण तुम्हाला पाठिंबा द्यायला इथे खूप लोक असतात. माझ्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी मी त्यांच्यावर वश्वास ठेवला. सगळ्यांनी मला माझ्या पद्धतीने- अगदी निडरपणे आणि क्षणाचा आनंद घेऊन खेळायला सांगितले. मानसिक ताकद हा माझ्या इथून शिकलेल्या गोष्टींचा एक महत्त्वाचा भाग होता,” ब्रेविस म्हणाला.
“टॉप लेव्हल क्रिकेट कशा प्रकारे काम करते हे समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त सामने खेळणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मी शेवटी टीमकडे परतलो तेव्हा मला नेमका कशाचा फायदा होईल हे समजून घेणे सोपे ठरले. तुम्ही निडर असले पाहिजे, बेजबाबदार नाही आणि कधी हल्ला करायचा आणि एक धाव कधी काढायची हे ओळखणे महत्त्वाचे आहे.”
त्याच्यासोबतचा किशोरवयीन खेळाडू तिलक वर्मासोबतच्या मैत्रीबाबत डीबीला विचारले असता त्याने सांगितले की आम्ही दोघेही अजून एकमेकांशी सातत्याने संवाद साधतो.
“मला तिलकची आठवण येते. तो एक खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकमेकांशी चॅट करत राहतो. तो माझ्यापेक्षा फक्त एक वर्ष मोठा आहे आणि त्याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. तिलक खूप मस्ती करतो. त्याच्या प्रँक्सना पुढच्या वर्षी कसे उत्तर द्यायचे हे सगळे मी ठरवतोय. मी त्याला आफ्रिकन भाषा शिकवलीय. त्याने मला थोडी हिंदी शिकवलीय. त्यामुळे मी आता हिंदीत संवाद साधायलाही उत्सुक आहे.”
सीझनच्या सुरूवातीला निकाल थोडे नकारात्मक लागल्यानंतरही टीम एकत्र राहिली आणि त्यांनी प्रयत्न करणे थांबवले नाही याही गोष्टीचे डीबीने खूप कौतुक केले.
“आम्ही हरलेले आठ सामने आमच्यासाठी कठीण होते पण टीम कायम सकारात्मक होती. आम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि शेवटच्या सहा सामन्यांत एक टीम म्हणून आम्ही एक मिनी टाटा आयपीएल म्हणून सामने खेळलो. निकालांनी टीमला पूर्णपणे बदलले आणि आम्ही एक फायरिंग मशीन झालो. पुढच्या सीझनमध्ये नेण्यासाठी ही एक सकारात्मक बाब ठरलीय,” तो शेवटी म्हणाला.
दृष्टीकोन, मैत्री आणि सांघिक विचार- टाटा आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये डीबीसाठी हा एक खराखुरा समृद्ध करणारा अनुभव होता. आगामी वर्षांमध्ये तो हा अनुभव कशा प्रकारे वापरतो हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत!