
मुंबई इंडियन्सकडून मार्क बाऊचरची हेड कोच म्हणून नेमणूक
मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकन महान खेळाडू विक्रमी विकेट कीपर मार्क बाऊचरची आयपीएल २०२३ पासून आपले हेड कोच म्हणून नेमणूक केली आहे.
मार्क बाऊचरचे एक विकेट कीपर, फलंदाज म्हणून दीर्घकालीन आणि लक्षवेधी करियर होते. त्यांनी विकेट कीपर म्हणून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रमही नोंदवलेला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी टायटन्स या दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या क्रमांकाच्या क्रिकेट फ्रँचायझीसोबत प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. या संघाला त्यांनी देशांतर्गत पाच वेळा अजिंक्यपद मिळवून दिले. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने २०१९ साली मार्क बाऊचर यांची नेमणूक मुख्य प्रशिक्षक म्हणून केली. त्यावेळी त्यांनी ११ कसोटी विजय, १२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांतील विजय आणि २३ टी२०आय विजय प्राप्त करून दिले.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष श्री. आकाश एम. अंबानी, म्हणाले की, “मार्क बाऊचरचे मुंबई इंडियन्समध्ये स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मैदानावरील आणि बाहेरील त्यांचा एक प्रशिक्षक म्हणून असलेला प्रचंड अनुभव आणि त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेले विजय यांच्यामुळे मार्क एमआयसाठी खूप महत्त्वाचे ठरतील आणि आमचा वारसा पुढे नेतील.”
मुंबई इंडियन्सचे हेड कोच श्री. मार्क बाऊचर म्हणाले की,“एमआयचा हेड कोच म्हणून नेमणूक होणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि गौरवाची बाब आहे. फ्रँचायझी म्हणून त्यांचा इतिहास आणि कामगिरी यांच्यामुळे हा संघ निश्चितच संपूर्ण क्रीडाजगतातील सर्वाधिक यशस्वी क्रीडा फ्रँचायझी ठरला आहे. मी हे आव्हान स्वीकारून संघाला आणखी यशस्वी बनवण्यासाठी उत्सुक आहे. हे उत्तम नेतृत्व आणि खेळाडू असलेले एक शक्तिशाली युनिट आहे. मी या अप्रतिम युनिटमध्ये मूल्यवर्धन करण्यासाठी सज्ज आहे.”