News

झिम्बाब्वे विरुद्ध भारत, दुसरा ओडीआय: भारताचा पुन्हा विजय, 2-0 ची आघाडी.

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेवर पाच गडी राखून मिळवलेला विजय म्हणजे त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांकडून सातत्याने धोका असतानाही संजू सॅम्सनने नाबाद 43 धावा करून भारताला 162 धावांचे लक्ष्य 25.4 ओव्हर्समध्ये पूर्ण करण्यास मदत केली.

भारतीय कर्णधार केएल राहुल याने टॉस जिंकला आणि आधी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शार्दूल ठाकूर दीपक चहरऐवजी खेळण्यास आला. हा एकमेव बदल करण्यात आला.

झिम्बाबवे कर्णधार रेगीस चकबवाने ताडीवानशे मारुमणी आणि रिचर्ड गारवाऐवजी ताकूझवनाशे कैतानो आणि तानक चिवंगा यांना खेळण्यास उतरवले.

पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच झिम्बाब्वेच्या ओपनर्सना भारतीय जलदगती गोलंदाजांविरुद्ध धावा करायला झगडावे लागले आणि त्यांनी आपले पहिले 10 ओव्हर्स 26/1 च्या धावसंख्येवर संपवले.

मोहम्मद सिराजने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये एकच विकेट घेतली. त्याचा चेंडू ओपनर टाकूदवनशे काइटनोच्या बॅटच्या कडेला लागून सरळ विकेट किपर संजू सॅम्सनच्या हातात विसावला.

बाराव्या ओव्हरमध्ये शार्दूल ठाकूरने इनोसंट कैया (16) आणि झिम्बाब्वेचा कर्णधार रेगीस चकबवा (2) याला बाद करताना फक्त दोन धावा दिल्या.

पहिल्या तीन ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेतलेल्या प्रसिद्ध कृष्णाने 13 व्या ओव्हरमध्ये वेस्ली माधेवेरेची (2) ची विकेट घेऊन आपले खाते उघडले.

झिम्बाबवेचा सिकंदर रझा नंतर लवकरच पॅव्हिलियॉनला परतला. या अष्टपैलू खेळाडूने एक चुकीचा शॉट ईशान किशनकडे ठोकला. ईशानने दोन पावले मागे जाऊन कॅच पूर्ण केला.

झिम्बाब्वेने 22 आणि 36 व्या ओव्हर्समध्ये फक्त दोन विकेट्स घालवल्या. तरीही त्यांची इनिंग सर्वबाद 161 अशी संपली कारण त्यांनी आपले तीन फलंदाज 37 व्या, 38 व्या आणि 39 व्या ओव्हरमध्ये गमावले.

शार्दूल ठाकूरने त्याला आलेल्या सात ओव्हर्समध्ये 3/38 अशी कामगिरी करून भारतासाठी सर्वोच्च गोलंदाज म्हणून कामगिरी केली.

भारताचा 162 धावांचा पाठलाग चुकीच्या पद्धतीने सुरू झाला. कर्णधार केएल राहुल दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव काढून बाद झाला.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची परीक्षा बघितली. राहुलपाठोपाठ शिखर धवननेदेखील आपली विकेट गमावली.

भारतीय क्रिकेट संघाचा पॉवरप्ले 75/2 वर संपला.

ल्यूक जोंगवेने काही महत्वाच्या भारतीय विकेट्स घेतल्या. ईशान किशन 12 ओव्हरमध्ये 6 धावांवर आणि शुभमन गिलला त्याने 14 ओव्हर्समध्ये 33 धावांवर बाद केले.

संजू सॅम्सन आणि दीपक हुडा यांच्यामधील 56 धावांच्या भागीदारीमुळे भारत विजयाच्या खूप जवळ पोहोचला. भारतीय संघाला 27 ओव्हर्समध्ये फक्त 10 धावांची गरज होती.

सॅम्सन 43 धावांवर नाबाद राहिला. त्याने इनोसंट कैयाचा चेंडू लॉंग ऑनवर टोलवून अगदी स्टाईलमध्ये सामना ताब्यात घेतला.

या विजयामुळे भारताने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 14 सामने जिंकले आहेत आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघ सोमवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी आमनेसामने येतील.