News

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या टी२०आयचे पूर्वावलोकनः जिंकू किंवा मरू निर्धारासह भारतीय संघ पुनरागमनासाठ

By Mumbai Indians

टी२०आय मालिकेत सलग दोन सामन्यांत हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मंगळवार दिनांक १४ जून रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे. या टी२०आय मालिकेत एकूण पाच सामने आहेत. 

टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने भारताला रविवारी कटक येथील बाराबती स्टेडियमवर चार विकेट्स राखून हरवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. गुरूवारी दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२०आय मालिकेत त्यांनी सात विकेट राखून विजय प्राप्त केला होता.

मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेली ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय टीम विशाखापट्टणम येथे मस्ट विन परिस्थितीत पुनरागमन करेल. टी२०आय स्वरूपात भारताचे या मैदानावर मिश्र रेकॉर्ड आहे. या स्टेडियमवर मेन इन ब्लूनी २०१६ मध्ये श्रीलंकेविरूद्ध विजय प्राप्त केला तर २०१९ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन विकेट्सनी हार पत्करावी लागली. २०१२ सालचा न्यूझीलंडविरूद्धचा एक टी२०आय सामना रद्द झाला होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या टी२०आयपूर्वी खालील काही मुद्द्यांवर चर्चा होत आहे:

ऋतुराज गायकवाडचा फॉर्म चिंतेचा विषय ठरलाय

भारताचे टी२०आय सलामीचे नियमित फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला पहिल्या दोन सामन्यांत संधीचे सोने करता आलेले नाही. या २५ वर्षीय खेळाडूला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आतापर्यंत दोन टी२०आयमध्ये फक्त २४ धावा करता आल्या आहेत. रविवारी कटक येथील बाराबती स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी२०आयमध्ये गायकवाड चार चेंडूंवर फक्त एक धाव काढून बाद झाला. दक्षिण आफ्रिकन जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा याच्या चेंडूवर त्याने अत्यंत हलका ड्राइव्ह मारला आणि केशव महाराजच्या हातात सोपा कॅच दिला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवायची संधी हवी असेल तर गायकवाडला पुढच्या तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.

प्रोटीआजच्या फलंदाजांविरूद्ध भारतीय स्पिनर्स निष्प्रभ

कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या टी२०आयमध्ये भारतीय स्पिनर्स युजवेंद्र चहल आणि अक्झर पटेल यांचा फारसा प्रभाव पडला नाही. दक्षिण आफ्रिकेने केलेल्या १४९ धावांपैकी तब्बल ४९ धावा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने बाराबती स्टेडियमवर फक्त चार ओव्हर्समध्ये दिल्या. दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीत खेळायला आलेल्या हेन्रिच क्लासेनने चहलच्या गोलंदाजीवर फक्त १३ चेंडूंमध्ये ३० धावा कुटल्या. त्यामुळे सामना आपल्या पाहुण्यांच्या दिशेने कलला. डावखुरा स्पिनर अक्झर पटेलनेही कटकमध्ये गोलंदाजी केलेल्या एका ओव्हरमध्ये १९ धावा दिल्या. मालिकेत दोन्ही भारतीय स्पिनर्स अद्यापतरी प्रोटीआजविरूद्ध अपयशी ठरले आहेत. त्यांनी फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाला या दोन्ही स्पिनर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

विजगमध्ये उमरान किंवा अर्शदीप पदार्पण करणार

सलग दोन टी२०आय सामन्यांमध्ये हात पत्करल्यानंतर भारताला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणाऱ्या ११ खेळाडूंच्या संघात काही बदल करणे आवश्यक ठरेल. यजमान संघ जम्मू आणि काश्मीरचा जलदगती गोलंदाज उमरान मलिक याला स्पिनरच्या बदली आणू शकतो. या २२ वर्षीय जलदगती गोलंदाजाने अलीकडेच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सातत्याने ताशी १५० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद यांच्यासाठी खेळताना २०.१८ च्या सरासरीने १४ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. विजगमधील मैदान छोटे आहे. त्यामुळे भारत डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग यालाही खेळवण्याचा विचार करू शकतो. अर्शदीप हा आयपीएलच्या शेवटच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्ससाठी यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २६ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेतल्या.  

भारतीय संघ मस्ट विन या स्थितीत असल्यामुळे मंगळवारी विशाखापट्टणम येथे आपली सर्वोत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.