News

ग्रीनला ब्लू आणि गोल्डची झळाळी!

By Mumbai Indians

हाच तो क्षण. २०१० ची आठवण येतेय ना... तरूण, नुकताच सुपरस्टार म्हणून गौरवलेला, अष्टपैलू, जोरदार फटकेबाजी करणारा, फलंदाजांना घाम फोडणारा गोलंदाज, उंच, देखणा आणि आकर्षक. आता येऊया २०२३ मध्ये कारण कायरन पोलार्डचा वारसा कॅमेरॉन ग्रीनकडून चालवला जाणार आहे.

आणी हो, खूप अटीतटीचे बोलीयुद्ध झाले. मुंबई इंडियन्सची ही आयपीएलच्या लिलावातली सर्वांत महागडी खरेदी ठरली असेही म्हणता येईल. शिवाय आयपीएलमधली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वांतम महागडी खरेदी ठरली आहे. त्याचे पहिले आयपीएल आणि १७.५० कोटी रूपयांत तो आता अधिकृत मुंबईकर झाला आहे.

आता बघा हे सगळे कसे घडले ते: आरसीबीने पहिली बोली लावली २ कोटींची. मग आपण ७ कोटी रूपयांपर्यंत या दोन बाजूंनी खेळल्या गेलेल्या लढाईत उतरलो. मग बंगळुरू बाजूला पडले, दिल्ली कॅपिटल्सनी उडी घेतली. त्यांनी अगदी या २३ वर्षीय खेळाडूचे मूल्य एकामागून एक २५ लाख आणि २५ लाख रूपये असे वाढवत नेले. आपल्याकडे एकूण २०.५५ कोटी रूपये होते आणि नऊ जागा भरायच्या होत्या. परंतु आपल्याला कोण अडवणार होते... तब्बल १७.५० कोटी रूपये देऊन आपण त्याला आपल्याकडे आणले कारण त्याचे महत्त्वच तितके मोठे आहे.

“ग्रीनच्या कामगिरीचा अभ्यास आम्ही मागच्या २-३ वर्षांपासून करत आहोत आणि आम्हाला जे हवे होते ते त्याच्याकडे आहे. तो आमच्यासाठी अत्यंत योग्य वयात आहे, कारण आम्ही मागच्या काही लिलावांमध्ये तरूण खेळाडूंचा शोध घेत आहोत,” असे आकाश अंबानी म्हणाले.

“लिलाव अत्यंत अटीतटीचा होता. परंतु ही लढाई आम्ही जिंकली याचा आम्हाला आनंद वाटतो. कॅमेरून हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो एमआयच्या रचनेत खूप चांगल्या प्रकारे बसेल, फक्त आत्ताच नाही तर भविष्यातही. आम्ही भविष्यावरही खूप लक्ष केंद्रित करून आहोत. तो आमच्या खेळाला खूप मजबूत करणार आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप उत्साहात आहोत,” एमआयचे प्रमुख मार्गदर्शक मार्क बाऊचर म्हणाले.

“हे सत्यात उतरले आहे हे मला खरेच वाटत नाहीये. स्वतःचा लिलाव होत असताना पाहणे ही थोडी विचित्र वाटणारी गोष्ट आहे खरेतर. शेवटची बोली लावली गेली तेव्हा मी किती नर्व्हस होतो आणि अक्षरशः थरथरत होतो हे मी शब्दांत सांगू शकत नाही. मी कायमच आयपीएलचा चाहता राहिलो आहे आणि त्याचा भाग होणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मुंबई इंडियन्स हे स्पर्धेचे एक पॉवर हाऊस आहे. त्यामुळे त्यांच्या टीममध्ये जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता मी खेळण्यासाठी खूप आतूर आहे,” असे कॅमेरॉन ग्रीन म्हणाला.

तयार व्हा पलटन, वानखेडेवर जायला सज्ज व्हा आणि मरीन ड्राइव्हवर छत्रीचा तसाही फायदा होणार नाहीये कारण षटकारांचा जोरदार मारा होणार आहे!