
INDvSL ओडीआय पूर्वावलोकनः कर्णधार हिटमॅनचे पुनरागमनः विश्वचषकाची नांदी
टी२०आय मालिकेने आपल्या भावनांना रोलर कोस्टर राइडवर नेले. आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची (ओडीआय) पाळी आहे. चला तर मग पलटन, तुमचे सीटबेल्ट घट्ट बांधा आणि पुन्हा एकदा रोमांचक क्रिकेटसाठी सज्ज व्हा.
न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये भारताच्या मिशन २०२३ विश्वचषकाची फार काही चांगली सुरूवात झाली नाही. आपण दोन्ही मालिका हरलो. परंतु, बांग्ला टायगर्सविरूद्ध अंतिम ओडीआयमध्ये भारतीय संघात खच्चून भरलेल्या क्षमतेचे दर्शन घडले.
ईशान किशन या आपल्या धडाकेबाज फलंदाजाने बांग्लादेशी गोलंदाजीची पिसे काढली. त्याने चट्टोग्राममध्ये १३१ चेंडूंमध्ये २१० धावांचा डोंगर उभा केला. किंग कोहलीनेसुद्धा एक अप्रतिम शतक झळकवले. गोलंदाजांनी आपल्याला २२७ धावांनी विजय मिळवून दिला.
ओडीआयमध्ये आता कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरामगन होणार आहे. टी२०आय मालिकेचा विजयी कर्णधार हार्दिक पंड्या आगामी मालिकेत उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. हिटमॅनने श्रीलंकन संघाविरूद्ध एडन गार्डन्सवर २६४ धावा कुटल्या होत्या ते आठवले की अंगावर रोमांच उभे राहतात. ही सामन्यांची मालिका १० जानेवारी २०२३ रोजी गोहत्ती येथील बर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू होत आहे. स्काय दादाला नुसता राडा घालताना आणि हिटमॅनला खळ्ळ खट्याक करताना पाहायला तयार व्हा. आणि हो, किशनसुद्धा तय्यार आहे.
काय: भारत विरूद्ध श्रीलंका, तीन सामन्यांची ओडीआय मालिका.
कधी: १० जानेवारी, १२ जानेवारी आणि १५ जानेवारी.
कुठे: गोहत्ती (पहिला ओडीआय), कोलकाता (दुसरा ओडीआय), तिरूवनंतपुरम (तिसरा ओडीआय)
काय अपेक्षित आहे: अविस्मरणीय खेळ, काट्याची टक्कर आणि बरंच काही! भारत विरूद्ध श्रीलंकेने मागील काही वर्षांत रोमांचक सामने जगाला दिले आहेत. आणखी काय अपेक्षित आहे? अर्थातच! आपल्या बॅट्स तर तळपतीलच पण आपले जलदगती गोलंदाज आणि स्पिनर्ससुद्धा मैदानावर जादू करायला तयार आहेत.
भारताचा ओडीआय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, अक्झर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
श्रीलंकेचा ओडीआय संघ: दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडीस, चरित असलांका, आशेन बंदरा, वानिंदू हसरंगा, धनंजय डिसिल्व्हा, नुवानिदू फर्नांडो, अविश्का फर्नांडो, चमिका करूणारत्ने, लाहिरू कुमारा, दिलशान मधुशंका, पाथुम निसांका, प्रमोद मदुशन, कासून रजिता, सदीरा समरविक्रम, महीश ठीक्शना, जेफ्री वांदरसी, दुनिथ वेलालागे.
आपण काय करायचे आहे: स्टेडियमवर गर्दी करा, टीव्हीसमोर बैठक मारा, स्नॅक्स तयार ठेवा आणि ओडीआय सामन्यांची मजा घ्या! एकूण १०० ओव्हर्सचा सामना म्हणजे जास्तीत जास्त जोरदार धमाके. स्कायदादा आणि आता कर्णधार रो पुन्हा आलाय त्यामुळे मनोरंजनात काहीही कमी राहणार नाही.