News

CT INDvNZ रिपोर्ट | वरूणच्या जादूत किवीज फसले; ऑसीजसोबत आता सेमीफायनल

By Mumbai Indians

पलटन, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तीन सामन्यांमध्ये तीन विजय! लै भारी वाटतंय ना?

न्यूझीलंडविरूद्ध श्रेयस अय्यरने आपला उत्तम फॉर्म कायम ठेवला आणि सुंदर अर्धशतकाची भेट आपल्याला दिली. परंतु, वरूण चक्रवर्तीने देखण्या पाच विकेट्स घेऊन आपले वर्चस्व दाखवले. अशा रितीने भारताने ग्रुप ए मध्ये पहिले स्थान पटकावले.

परिणामी भारतीय संघाने मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी दुबईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमी फायनल्समध्ये जागा मिळवली आहे.

डळमळती सुरूवात आणि किवीजची देखणी फिल्डिंग

मॅट हेन्री हा विशेषतः पॉवर प्लेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी आहे. रविवारी आपल्याला त्याची एक झलक पाहायला मिळाली.

किवीजच्या या जलदगती खेळाडूने उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला एलबीडब्ल्यू केले तर आपला हिटमॅन कायली जेमीसन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्यानंतर लवकरच विराट कोहलीही बाद झाला. ग्लेन फिलिप्सने पॉइंटवर घेतलेला त्याचा कॅच हॅट्स ऑफ होता. जबरदस्तच एकदम.

श्रेयस विरूद्ध न्यूझीलंड म्हणजे अय्यर नाही फायर!

टीम इंडिया ३/३० वर होती. अत्यंत चिंताजनक परिस्थिती होती. परंतु श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी सुटका केली.

सीडब्ल्यूसी२३ मध्ये श्रेयसने वानखेडेवर केलेल्या १०५ धावा पलटनच्या मनातून अद्याप गेलेल्या नाहीत. या फ्लायरने पुन्हा एकदा किवीजविरूद्ध ही अप्रतिम कामगिरी केली.

या दोघांनी स्थिर भागीदारी करताना चांगलीच धमाल केली. श्रेयसने तर कमालच केली. नंतर अक्षरही आला आणि त्यांनी १३६ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या. आपल्याला हुश्श झाले अगदी! 👏

अक्षर ४२ धावा करून बाद झाला तर श्रेयसने ओडीआयमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सलग दुसऱ्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. त्याच्या ७९ (९८) धावांनी भारताला मधल्या ओव्हर्समध्ये स्थिर धावसंख्या करता आली.

दुबईत पांड्याची चलती

किवीजच्या जलदगती खेळाडूंनी श्रेयस बाद झाल्यानंतर धावसंख्या ताब्यात ठेवली. परंतु शेवटच्या टप्प्यात मात्र आपल्याला पांड्या पॉवरचा डोस मिळाला.

त्याने आपल्या काही ट्रेडमार्क शॉट्सच्या मदतीने नाबाद १४ (२१) वरून प्रत्येक चेंडूवर एकेक धाव काढत ४५ धावा केल्या. त्याने झक्कासपैकी दोन चौकार आणि एक षटकार मारून पेनल्टी टाइम ओव्हरचा पुरेपूर फायदा घेतला.

…हार्दिकची गोलंदाजी!

बॅटने शेवट करायचा आणि बॉलने सुरूवात करायची. हार्दिकच्या या व्हर्शनची आपल्याला सवय झालीय.

त्याच्या सुंदर बाऊन्सरने रचिन रविंद्रला अनियंत्रित अप्पर कट मारायला भाग पाडले. हा कॅच अक्षरने पकडला.

तुम्हालाही तो बघायचाय का? हा बघा मग ⬇️ 

कॅप्शनमध्ये सगळंच आलंय 🔥

चक्रवर्तीचे चक्रव्यूह

वरूण चक्रवर्तीने आपले वरूणास्त्र चालवून किवीजभोवती चक्रव्यूह रचले. आपल्या ओडीआय करियरच्या सुरूवातीलाच त्याने आपण कमी नाही हे दाखवून दिले.

अत्यंत सुंदर गोलंदाजी, उजव्या हाताने स्पिन करून त्याने विल यंगला घरी पाठवले. किवीजना हे चक्रव्यूह भेदता आले नाही कारण दुसऱ्या वेळी तो आला आणि त्याने ग्लेन फिलिप्स व मायकेल ब्रेसवेलला बाद करून भारतीय संघाला वर्चस्व मिळवून दिले.

वरूणने आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या. मायकेल संतनर आणि मॅट हेन्रीला घरी पाठवून अविस्मरणीय पाच विकेट्स घेतल्या. जाळ अन् धूर संगटच म्हणतात ते असे!

फक्त वरूणनेच कमाल केली नाही बरं का. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणणि रवींद्र जडेजा यांनी न्यूझीलंडच्या मधल्या फळीचा सुपडा साफ केला. कुलदीपने विल ओरूकेला बाद करून भारताला ग्रुप टप्प्यात एक चांगला शेवट करून दिला.

 

थोडक्यात धावसंख्या: भारताकडून न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव. भारत ५० ओव्हर्समध्ये २४९/९ (श्रेयस अय्यर ७९; मॅट हेन्री ५/४२) न्यूझीलंड ४५.३ ओव्हर्समध्ये २०५/१० (केन विल्यमसन ८१; वरूण चक्रवर्ती ५/४२).