मिताली राजः क्रिकेट सम्राज्ञीच्या ऐतिहासिक कारकीर्दीला पूर्णविराम
तब्बल २२ वर्षांचं करियर. तिने २६ जून १९९९ रोजी भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना मिल्टन केन्स, यूके येथे आयर्लंडविरूद्ध खेळला. तो एकदिवसीय सामना होता.
Thank you for all your love & support over the years!
— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u
या आपल्या पहिल्याच सामन्यात मितालीने तब्बल ११४* धावा फटकावल्या आणि अवघ्या १६ वर्षे २०५ दिवसांच्या वयात महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या सर्वांत तरूण खेळाडूचा सन्मान तिने पटकावला. हा विक्रम अजूनही कोणी मोडीत काढू शकलेलं नाही.
तिने आपल्या करियरमध्ये एकदिवसीय क्रिकेट सामने सर्वांत जास्त खेळले आणि या सामन्यांची ती सम्राज्ञी होती. मिताली राज ही महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आघाडीची धावा फटकावणारी खेळाडू आहे. तिने २३२ सामन्यांमध्ये ५०.६८ च्या सरासरीने ७८०५ धावा काढल्या आहेत आणि त्यातल्या १५५ सामन्यांमध्ये ती टीमची कर्णधार होती.
तिने सर्वाधिक महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत आणि इतिहासात सर्वाधिक डब्ल्यूओडीआयमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे.
सलग सात डब्ल्यूओडीआय सामन्यांमध्ये अर्धशतकांचा पाऊस पाडणारी मिताली राज ही पहिली महिला खेळाडू आहे.
मितालीची फलंदाजी तर देखणी होतीच. पण त्याचबरोबर ती भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असल्याचं मानलं जातं. २०१४ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यांत ऐतिहासिक १-० ने विजय मिळवणाऱ्या टीमची ती कर्णधार होती. दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप अंतिम फेरीत देशाचं नेतृत्व करणाऱ्या पुरूष किंवा स्त्रियांच्या संघाची मिताली पहिली भारतीय कर्णधार ठरली.
मिताली राजचं कसोटी क्रिकेटमधलं करियरदेखील उत्तुंग आहे. तिने १२ कसोटी सामन्यांमध्ये ६९९ धावा काढल्यात. ती महिलांच्या कसोटी सामन्यात द्विशतक काढणारी एकमेव खेळाडू आहे आणि २००२ सालचा इंग्लंडविरूद्ध तिचा २१४ चा स्कोअर हा महिलांच्या कसोटी इनिंगमधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च आहे.
तिने ८९ टी२०आय खेळले असून त्यात २३६४ धावा काढल्या. त्यात १७ अर्धशतकं झळकवली आणि तिची सर्वोच्च धावसंख्या ९७* होती.
मिताली निवृत्त होताना आज तिच्या नावावर १०,८६८ धावा आहेत. महिलांच्या क्रिकेट इतिहासात ही धावसंख्या सर्वाधिक आहे. क्रिकेटमधल्या एका महान खेळाडूचं दिमाखदार करियर आता इतिहासजमा होणार आहे.
मिताली, तुझे खूप खूप आभार!