
MI vs KKR: मुंबई इंडियन्सने केकेआरला ८ विकेट्सनी हरवून मिळवला दणदणीत विजय
एमआयकडून रायन रिकेल्टनने देखणा अर्धशतकी खेळ करून टीमला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजीत अश्वनी कुमारने चार विकेट्स घेतल्या.
आयपीएल २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात आपल्या टीमने तडाखेबाज पुनरागमन केले आणि कोलकाता नाइट रायडर्सना आपल्या बालेकिल्ल्यात ८ विकेट्सनी पराभूत केले.
वानखेड़े स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरचा संघ १६.२ ओव्हर्समध्ये फक्त ११६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर आपल्या फलंदाजांनी फक्त १२.५ ओव्हर्समध्येच २ विकेट्स देऊन १२१ धावा केल्या.
KKR vs MI सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली आणि केकेआरच्या एकाही खेळाडूला मैदानात जास्त वेळ टिकू दिले नाही.
कोलकाताच्या खेळाची सुरूवात खूप वाईट झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने सुनील नारायणच्या रूपात मुंबईला पहिला विजय मिळवून दिला. तो खाते न उघडताच पॅव्हिलियनला परतला. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चहरने क्विंटन डिकॉकला (१) अश्वनी कुमारच्या हातात कॅच देऊन बाद केले.
यानंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या अश्वनी कुमारने कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. त्याला फक्त ११ धावा करता आल्या.
अशा रितीने उत्तम गोलंदाजी करत अश्वनी कुमारने चार विकेट्स घेतल्या. त्याने मनीष पांडे (१९), आंद्रे रसेल (५) आणि रिंकू सिंह (१७) यांनाही बाद केले.
मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी कायम ठेवत ४५ धावांवर केकेआरचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला.
केकेआरकडून अंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कोणत्याही खेळाडूने जास्त धावा केल्या नाहीत.
रमणदीप सिंगने १२ चेंडूत २२ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याचवेळी व्यंकटेश अय्यर तीन धावा करून बाद झाला तर हर्षित राणा चार धावा करून बाद झाला.
मुंबईने १६.२ ओव्हर्समध्ये संपूर्ण संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि आपल्या संघासमोर ११७ धावांचे लक्ष्य ठेवले.
मुंबईकडून दीपक चहरने 2 तर हार्दिक पांड्या, विघ्नेश पुथूर, मिचेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयने चांगली सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी खेळ सुरू केला. सहाव्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलने मुंबईला पहिला धक्का दिला आणि रोहितला केवळ १३ धावा करता आल्या.
यानंतर रायनने डावाची धुरा सांभाळली. त्याने शानदार अर्धशतक झळकवत संघाला पहिला विजय मिळवून दिला. त्याने ४१ चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६२ धावांची नाबाद खेळी खेळली.
नाबाद राहताना सूर्यकुमार यादवने नऊ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले, त्याने आपल्या डावात तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. याशिवाय विल जॅकने १७ चेंडूत १६ धावा केल्या आणि षटकारही लगावला.
अशा रितीने आपल्या संघाने १२.५ ओव्हर्समध्ये दोन विकेट्स देऊन १२१ धावा करून पहिला विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना आता शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध असेल.
थोडक्यात धावसंख्या
कोलकाता नाइट रायडर्स: १६.२ ओव्हर्समध्ये ११६/१०; अंगकृष रघुवंशी २६ (१६), अश्वनी कुमार ४/२४
मुंबई इंडियन्स: १२.५ ओव्हर्समध्ये १२१/२; रायन रिकेल्टन ६२* (४१), आंद्रे रसेल २/३५