News

आयपीएल सामना तिसरा | MIvKKR पूर्वावलोकन: वानखेडे= आपलं घर, आपले इमोशन्स

By Mumbai Indians

प्रिय पलटन,

वानखेडेवर तुडुंब गर्दी बघून, प्रत्येक चेंडूवर जोरात जल्लोष साजरा केल्याला आता ३१७ दिवस झाले आहेत. २०२४ हे वर्ष आपल्यासाठी फारसे चांगले नव्हते आणि गोष्टी आपल्याला हव्या तशा झाल्या नाहीत. परंतु तुम्ही सर्वजण अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या संघाच्या पाठीशी उभे राहिलात. आता आमची वेळ आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची. 💙

आता जाऊया ३१ मार्च २०२५ कडे. अवघ्या एका दिवसात नवीन सूर्योदय होणार आहे, फ्लडलाइट्स चमकणार आहेत, आपला उत्साह शिगेला पोहोचणार आहे आणि स्टँड्स ब्लू अँड गोल्डमध्ये चमकणार आहे. याचे कारण एकच आमच्या मुंबईत सामन्याचा दिवस असाच असतो, नाही का?!

हा आपल्यासाठी फक्त एक सीझन नाहीये. एक नवीन युग, एक नवीन प्रारंभ आणि एमआय खरोखर काय आहे हे जगाला दाखवण्याची एक संधी आहे. 💪

आपण आयपीएल २०२५ मध्ये प्रथमच वानखेडेवर खेळणार आहोत. त्यामुळे आम्हाला तुमची प्रचंड गरज आहे. आम्हाला ढोल ताशे हवेत आणि हे स्टेडियम आमचा बालेकिल्ला बनवणारी प्रत्येक गोष्ट हवी आहे. कारण या मैदानात आम्ही एकटे नसतो. आपण सर्वजण खेळत असतो.

कोलकाता नाइट रायडर्स या आपल्या आगामी प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध खेळतानाच्या असंख्य आठवणी आहेत. रोने केकेआरविरूद्ध २०१२ मध्ये आपले पहिले आयपीएल शतक फटकावले तर एचपी-पॉलीच्या कामगिरीमुळे आपल्याला २०१५ मध्ये पाच धावांनी अत्यंत रोमांचक विजय मिळाला.

शिवाय आपल्या सूर्यादादाने २०२३ मध्ये एमआयसाठी केकेआरविरूद्ध खेळतानाच कर्णधारपदाचा मुकुट परिधान केला. आपण त्या सामन्यात पाच विकेट्सनी सहज विजय मिळवला.

तर मग पलटन, वानखेडेला एक अद्वितीय शक्ती बनवूया. प्रत्येक षट्कार, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक क्षण आठवणीत राहूदेत. आम्ही १०० टक्के नाही तर २०० टक्के देणार आहोत. त्यापेक्षा कमी काहीही नाही.

२०२५ मध्ये दोन सामने कठीण गेल्यानंतर आमच्या पोळलेल्या मनाला शांत करण्यासाठी वानखेडेसारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मोठ्या संख्येने या, तुमचा एमआय ब्लू अभिमानाने परिधान करा आणि #PlayLikeMumbai म्हणजे काय हे जगाला दाखवून देऊया!

चला तर मग... गणपती बाप्पा मोरया!! 🙏

आपलीच,

एमआय फॅमिली

**********

एडमिन आत्ता खूप इमोशनल झालेत. पलटन, आपल्या लाडक्या वानखेडेवर पुन्हा एकदा मुंबई... मुंबई...चा जयघोष करणार आहे ना म्हणून!!! आलोच... टिश्यू कुठेयत रे… 🥹

आता आपण पाहूया सामन्याच्या दिवशी पलटनसाठी महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत त्या.

• सोमवार असल्यामुळे कामावरून लवकर सुट्टी मारायची आहे. आजारी पडा किंवा काहीही कारण द्या. आम्हाला काही माहीत नाही. यायला लागतंय म्हणजे लागतंय! 👀

• विजयासाठी दहीसाखर ठेवा जिभेवर!!! 😋

• लोकल ट्रेनच्या वेळा तपासून घ्या आणि मुंबई इंडियन्सच्या घरी वेळेत पोहचा 🚃

• टपरीवरचा कटिंग चाय आणि बन मस्का... चर्चगेट स्थानकासमोर. सामन्यापूर्वी पोटात इंधन नको का. 🫖

• MI Jersey – ही तर पायजेच पायजे. 😎

• एमआय तिकिटे– स्टेडियमवरचा तुमचा प्रवेश याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला हे जाणून घ्यायची गरज आहे. ⬇️

भेटूया मग वानखेडेवर 👋