News

AUSvIND, 5th Test: भारताचा जिगरबाज लढा पण ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने विजय!

By Mumbai Indians

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा संपली. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा सहा विकेट्सनी विजय झाला. 

वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराने दणदणीत कामगिरी केली. त्यामुळे पाच सामन्यांमध्ये ३२ विकेट्ससाठी त्याला मालिकापटू म्हणून घोषित करण्यात आले. 🙌

या मालिकेत बऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा झाल्या नाहीत. परंतु आपल्याला इथे बरेच काही शिकायला मिळाले. त्यामुळे आपण पुढच्या स्पर्धेत नक्कीच दणक्यात पुनरागमन करू.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तीन दिवसांत घडलेला घटनाक्रम हा असा होता… ⬇️

पहिला दिवस | खूप प्रयत्न, प्रचंड मेहनत आणि नाट्यमय शेवट!

प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या शेवटी १८५/१० अशी धावसंख्या नोंदवली.

जलदगती गोलंदाजांसाठी योग्य असलेल्या हिरव्या खेळपट्टीवर यजमान संघाने आपल्या भात्यातल्या सर्व जलदगती गोलंदाजांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि भारतीय फलंदाजांना जराही मोकळीक दिली नाही. याही परिस्थितीत ऋषभ पंतने सर्वाधिक म्हणजे ४० धावा केल्या तर रवींद्र जडेजा (२६) आणि जसप्रीत बुमरा (२२) यांनी चांगले योगदान दिले.

पण प्रेक्षकांना सगळ्यात जास्त मजा आली ती बूम आणि सॅम कोन्स्टास यांच्यादरम्यान पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूदरम्यान नॉन स्ट्रायकर एंडला झालेल्या बाचाबाचीमुळे.

आपल्या या लाडक्या राष्ट्रीय खजिन्याने जराही माघार न घेता उस्मान ख्वाजाला बाद केले. नंतर संपूर्ण टीमसोबत या विकेटचा जोरदार आनंदोत्सव साजरा केला. हा क्षण प्रत्यक्षात पाहायलाच हवा. शब्दांत त्यांचे वर्णन करणे अशक्य आहे. तुम्हीच पाहा...

दिवस दुसरा| थोडीशी आघाडी, पंतचा जबरदस्त हल्लाबोल

आदल्या दिवसाच्या झणझणीत समाप्तीनंतर सामन्याचा रंगच पालटला. भारतीय जलदगती गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीचे सुंदर प्रदर्शन आणि स्लिपमध्ये अप्रतिम विकेट्स घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

जस्सीभाईच्या गोलंदाजीवर मार्नस लाबुसचेंजच्या विकेटने ऑस्ट्रेलियाची गळती सुरू झाली. नियमितपणे विकेट्स पडल्यामुळे भारतीय क्रिकेट टीमला बॅगी ग्रीन्सना चहाच्या ब्रेकपूर्वी १८१ धावांवर गुंडाळून टाकणे शक्य झाले. त्यामुळे आपल्या हातात थोडीशी का होईना आघाडी आली.

मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा मालिकेतला आपला पहिला सामना खेळत होते. त्यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

त्यानंतर यशस्वी जैस्वाल मैदानात उतरला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चार चौकार फटकावले आणि खेळाची सकारात्मक सुरूवात केली.

या वेळी ऋषभ पंतने मात्र कमाल केली. त्याने आपल्या देखण्या फलंदाजीचे प्रदर्शन घडवत ३३ चेंडूंमध्ये ६१ धावांची नोंद केली. त्यात सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

पंतने फक्त २९ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियात पाहुण्या येणाऱ्या फलंदाजाने सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम नोंदवला. तोडून टाकलं रे ऋषभ! 👏

भारताने दुसरा दिवस १४१/६ वर संपवला. आपल्याकडे १४५ धावांची आघाडी होती. मालिकेचा निर्णय घेणारा तिसरा दिवस दोघांसाठीही प्रतीक्षेत होता.

दिवस तिसरा | बोलंडचा कहर, भारताचा लढा

आदल्या दिवशी आपल्या नावावर चार विकेट्स असलेल्या स्कॉट बोलंडाने सिराज आणि बुमराला बाद करून ६/४५ अशा विकेट्सवर आपली दुसरी इनिंग संपवली.

आपल्या संघासाठी कांगारूंना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने १६२ धावा हे फारच कमी लक्ष्य होते. प्रसिद्ध कृष्णाने हल्ल्याचे नेतृत्व केले. आदल्या दिवशी दुखापतग्रस्त झाल्यामुळे जसप्रीत बुमरा मैदानात उतरू शकला नाही.

दुपारच्या जेवणानंतर उस्मान ख्वाजा बाद झाला आणि ट्राविस हेड आणि ब्यु वेबस्टर यांनी ५८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे विजय त्यांच्या खात्यात जमा झाला.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ११ जून २०२५ रोजी लॉर्ड्स, लंडन येथे होईल. भारतीय क्रिकेट टीमला डब्ल्यूटीसी सुरू झाल्यापासून प्रथमच अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यात अपयश आले.

 

थोडक्यात धावसंख्या: भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेट्सनी पराभव. भारत १८५/१० (ऋषभ पंत ४०, स्कॉट बोलंड ४/३१) आणि १५७/१० (ऋषभ पंत ६१, स्कॉट बोलंड ६/४५) ऑस्ट्रेलिया १८१/१० (ब्यु वेबस्टर ५७, प्रसिद्ध कृष्णा ३/४२) आणि १६२/४ (उस्मान ख्वाजा ४१, प्रसिद्ध कृष्णा ३/६५).