News

INDvBAN, तिसरा टी२०आय: फक्त एकच शब्द- वर्चस्व!

By Mumbai Indians

निजामांच्या शहरात आपण जे काही अनुभवलंय त्याला सर्वच विशेषणं कदाचित कमी पडतील. पण आपण प्रयत्न करूया...

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाने सलग २० ओव्हर्ससाठी १.४ अब्ज भारतीयांना टीव्हीला चिकटून बसायला भाग पाडले. क्रिकेट जगतातील सगळ्यांत कडक फलंदाजीचे दर्शन आपल्या फलंदाजांनी संपूर्ण जगाला घडवले.

आपल्या स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडवून टीम इंडियाने २९७/६ धावा केल्या. त्यांनी भरभरून विक्रमही केले.

संजू सॅम्सनने आपले पहिले टी२०आय शतक पूर्ण केले आणि सूर्या व हार्दिक या दोघांनी आपले नेहमीची जबाबदारी पार पाडली. त्यांनी एक चांगला स्ट्राइक रेट कायम ठेवून अनुक्रमे ७५ आणि ४७ धावांचे योगदान दिले.

 
 
 
View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत टीम इंडियाने खेळ पूर्ण करत प्रचंड मोठा विजय नोंदवला. त्यांनी मालिका अक्षरशः व्हाइटवॉश केली.

पलटन, हा अद्भुत अनुभव पुन्हा जगण्यासाठी तयार व्हा...

पहिल्या क्षणापासून तोडफोडीला सुरूवात!

सुरूवातीच्या टप्प्यातच अभिषेक शर्माची विकेट दिल्यानंतर टीम इंडियाने आपला प्लॅन स्पष्ट केला- बॅटिंगसाठी पिच चांगली आहे. तिचा पुरेपूर वापर करायचा.

संजू सॅम्सन आणि सूर्या दादाने बांग्लादेशी गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. संपूर्ण मैदानात त्यांना पळवले.

आपल्या मि. ३६०° ने विकेट कीपरच्या डोक्यावरून खास सुपला शॉटसह फटकेबाजी सुरू केली. तो हे करतो तेव्हा आतषबाजी होणार हे पलटनला माहीतच असते.

या दोघांच्या आतषबाजीला थांबवणारे कोणीही नव्हते. त्यांनी जराही दयामाया न दाखवता आमच्या मुंबईतल्या काली पीलीमधलं मीटर जसं पळत असतं तसा धावफलक पळता ठेवला.

या फटकेबाजीत टीम इंडियाने सहा ओव्हर्समध्ये १७ बाऊंड्रीज मारल्या (१२ चौकार आणि पाच षटकार) आणि आपण ८२/१ धावांची नोंद केली. टी२०आय मधली ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या ठरली! तोडेला है... तोडेला है! 

सॅम्सन? नाही, तो तर सॅम्टन!

संजू चेट्टानने दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग चार वेळा चेंडू सीमापार टोलवला तेव्हा चाहत्यांना आणखी एक मोठी कामगिरी होणार याची खात्रीच पटली. या २९ वर्षीय तरूण खेळाडूने त्यांची इच्छा पूर्णही केली.

त्याने समोर काय चाललंय हे समजायला जराही वेळ दिला नाही. त्यामुळे विश्लेषकांच्या डोळ्यांसमोर तारेच चमकले.

रिशाद हुसेनच्या १० व्या ओव्हरमध्ये या विकेट कीपर फलंदाजाने पाच दणदणीत षटकार ठोकले. त्यामुळे सिटी ऑफ निझाम्समध्ये नक्की काय चाललंय याची उत्सुकता असलेल्यांचे डोळेच पांढरे झाले!

त्याच्या फलंदाजीतला प्रत्येक स्विंग सीमारेषेपल्याड गेला. त्यानंतर प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न पूर्ण झाले.

त्याने ४० चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा केल्या. त्यामुळे त्याची नोंद भारतीय खेळाडूकडून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेगवान टी२०आय शतक म्हणून विक्रमांत झाली. पहिला क्रमांक रोहित शर्माचा असून त्याने २०१७ मध्ये ३५ चेंडूंमध्ये १०० धावा नोंदवल्या होत्या.

ताऱ्यांनी भरलेले आकाश!

एखाद्या दिवशी फलंदाजाने दुसऱ्या बाजूने सहाय्यक भूमिका बजावली असती. पण तुम्ही सूर्यकुमार यादव असता तेव्हा हे शक्य होत नाही.

त्याने ३५ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या. त्याही २१४.२९ च्या सरासरीने. त्यात त्याने आठ चौकार आणि पाच षटकार ठोकले. हैदराबादमध्ये हा तर एखाद्या सिनेमाचा शो असावा असे वाटत होते.

सूर्याने मधल्या फळीत आपल्या खेळाचा आनंद घेतला. त्याने अगदी मजेमजेत चेंडू सीमापार टोलवला आणि भारताला फक्त १४ ओव्हर्समध्ये २०० धावा पूर्ण करण्यास मदत केली. टी२०आयमध्ये हा विक्रम करणारी ही दुसरीच सर्वाधिक वेगवान टीम आहे.

खेल अभी खत्म नहीं हुआ... हार्दिक रियानला विसरलात का!

टीम इंडिया २०६/३ वर आधीच पोहोचली होती. पण त्यात भर घालायला आले कुंगफू पांड्या आणि रियान पराग. त्यांनी पेडलवरचा पाय काढलाच नाही. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना ते टोलवतच राहिले.

या दोघांनी बांग्ला टायगर्सच्या गलथान गोलंदाजी आणि संथ फील्डिंगचा चांगलाच समाचार घेतला. प्रतिस्पर्धी संघाच्या जखमेवर मीठ चोळत या दोघांनी आणखी ७० धावा कुटल्या.

रियान परागने १३ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या तर एचपीने अत्यंत क्लासिक शॉट्स मारले. त्याने १८ चेंडूंमध्ये ४७ धावा करताना चार चौकार आणि षटकार ठोकले. पलटनने तर निस्ता राडा, हार्दिक भाऊ! असेच म्हटले असेल.

शेवटच्या ओव्हरमध्ये १५ धावा कुटल्या गेल्या. त्यामुळे भारतीय संघाने २९७/७ असा दणदणीत स्कोअर उभा केला. ही धावसंख्या कोणत्याही देशाने टी२०आय मध्ये केलेली सर्वाधिक धावसंख्या ठरली.

धावांचा पाठलाग- एक औपचारिकता फक्त

बांग्लादेशसाठी आणखी काय चुकले असते? धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर एक विकेट पडली.

नंतर आपल्या शेजाऱ्यांना पॉवर प्लेच्या शेवटी ५९/३ वर समाधान मानावे लागले. त्यांच्या फलंदाजांना प्रेशरखाली खेळताच आले नाही.

लिट्टन दास आणि तौहित हृदय यांनी ५३ धावांची भागीदारी करून आपला खेळ सावरायचा प्रयत्न केला. परंतु लिट्टन रवी बिष्णोईच्या गोलंदाजीला बळी पडला आणि आपल्या स्टार तिलक वर्माने त्याची सुंदर कॅच घेतली.

मेन इन ब्लूने आपले वर्चस्व कायम राखले होते. विकेट्स तर अधून मधून पडतच होत्या. हृदोय आपल्या टीमसाठी एकांडा शिलेदार ठरला. त्याने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ६३ धावा केल्या.

थोडक्यात धावसंख्या: भारत २० ओव्हर्समध्ये २९७/६ (संजू सॅम्सन १११, सूर्यकुमार यादव ७५; तान्जिद हसन साकीब ३/६६) कडून बांग्लादेशचा पराभव १६४/७ धावा २० ओव्हर्समध्ये (तौहिद हृदोय ६३*; रवी बिष्णोई ३/३०, मयंक यादव २/३२) १३३ धावांनी पराभव.