News

INDvENG, पहिला टी२०आय: दणदणीत विजय आणि मालिकेला तडाखेबाज सुरूवात!

By Mumbai Indians

आनंदाच्या शहरात आनंदी आनंद! 🤗

भारतीय क्रिकेट टीमने प्रोटीआजविरूद्ध जिथे थांबले होते तिथूनच सुरूवात केली. त्यांनी ईडन गार्डन्सवरील मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरूद्ध आतषबाजी केली.

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडच्या संघात जो बटलर हा एकांडा शिलेदार ठरला. त्याने अर्धशतक पूर्ण केले.

आपल्यासमोर फक्त १३३ धावांचे लक्ष्य होते. टी२०आय चॅम्पियन्ससाठी हे कठीम लक्ष्य नव्हते. चला तर मग बघूया काय झाले ते

अर्शदीप सिंग- टी२०आयमधील भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू

अर्श पाजी, आल्याबरोबर रेकॉर्डच केलं ना! 👏

या २५ वर्षीय खेळाडूने सेट व्हायला जराही वेळ घेतला नाही. त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांना बाद केले.

या दरम्यान त्याने आपल्या टी२०आयच्या विकेट्सची संख्या ९७ केली आणि युजवेंद्र चहलला मागे टाकून टी२०आयच्या इतिहासातील टीम इंडियाचा आघाडीचा विकेट घेणारा खेळाडू ठरला.

पॉवर प्ले संपला तेव्हा इंग्लंडच्या स्कोअरकार्डवर ४६/२ धावा होत्या.

वरूणच्या जादूला ब्रिटिशांकडे तोड नाही!

विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मधून तोडफोड करून आलेल्या वरूण चक्रवर्तीने याही सामन्यात आपला उत्तम फॉर्म कायम ठेवला.

आठव्या ओव्हरमध्ये या उजव्या हाताच्या स्पिनरने धोकादायक हॅरी ब्रूक आणि लियम लिव्हिंग्स्टनला बाद केले. त्याच्या अद्वितीय खेळामुळे ते बिचारे भांबावून गेले होते. एक नंबर टवका बॉलिंग रे, वरूण! 🔥 बघा तरी इथे:

नंतर या इनिंगमध्ये त्याने जो बटलरला ४४ चेंडूंमध्ये ६ धावांवर घरी पाठवले. नितीश कुमार रेड्डीने डीप स्क्वेअर लेगवरून धावत येऊन जबरदस्त कॅच पकडला. भारीच काम केलं की! 🙌

एचपी आणि बापू या गुज्जू भावांचा जलसा!

नंतर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हेही मागे राहिले नाहीत. त्यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

आमच्या पांड्याने जेकब बेथेल आणि जोफ्रा आर्चरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला तर अक्षर पटेलने जेमी ओव्हरटन आणि गुस एटकिन्सनला परत पाठवले.

थोडक्यात सांगायचे तर आपल्या गोलंदाजांची झक्कास कामगिरी झाल्यामुळे पाहुण्यांना २० ओव्हर्समध्ये फक्त १३२ धावा करता आल्या. हीच धमाल फलंदाजांनीही कायम ठेवली.

अगदी आरामात पाठलाग!

सलामी फलंदाज संजू सॅम्सन आणि अभिषेक शर्मा यांनी दणादण फटकेबाजी केली. अभिषेकने फक्त २० चेंडूंमध्ये अर्धशतक फटकावले. हे टी२०आयमध्ये इंग्लंडविरूद्ध भारताने केलेले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठरले. 🤩

संजूने तर दुसरीकडे गुस अटकिन्सनला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पूर्ण धुवून काढले. त्याने या ओव्हरमध्ये ४,४,०,६,४,४ धावा केल्या. चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतले होते.

प्रतिस्पर्धी गोलंदाज या वारूंना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. परंतु त्यांना काय करावे हेच कळत नव्हते.

त्यानंतर तिलक वर्मा मैदानात उतरला. त्याने १३ व्या ओव्हरमध्ये औपचारिकता पूर्ण करून संघाला अगदी आरामात सात विकेट्सनी विजय मिळवून दिला.

 

थोडक्यात धावसंख्या: इंग्लंडचा भारताकडून सात विकेट्सनी पराभव. इंग्लंड १३२/१० (जो बटलर ६८, वरूण चक्रवर्ती ३/२३) भारत १३३/३ (अभिषेक शर्मा ७९, जोफ्रा आर्चर २/२१)