
CSK vs MI: मुंबई इंडियन्सचा सीझनच्या पहिल्याच सामन्यात चार विकेट्सनी पराभव
आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात आपल्या टीमला चेन्नई सुपर किंग्सकडून चार विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. सीझनच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ससोबत झाला.
एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजे चेपॉकवर रविवारी झालेल्या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आपल्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स देऊन 155 धावा केल्या.
सीएसकेने पहिला सामना 19.1 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 158 धावा करून जिंकला.
CSK vs MI सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आपल्या सुरुवात चांगली झाली नाही. खलील अहमदने आपल्या सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा खाते न उघडता खलीलचा बळी ठरला. यानंतर खलीलने तिसऱ्या ओव्हरमध्ये रायन रिकेल्टनला बाद केले. रिकेल्टनने सात चेंडूंत तीन चौकारांसह १३ धावा केल्या.
मुंबईला तिसरा धक्का विल जॅकच्या (11) रूपाने बसला. रविचंद्रन अश्विनने विलला शिवम दुबेकरवी कॅच घेऊन केले.
नंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची धुरा सांभाळत चांगली धावसंख्या उभारण्यात मदत केली. मात्र त्यांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. ११ व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमारच्या रूपाने मुंबईला चौथा धक्का बसला. त्याला महेंद्रसिंग धोनीने बाद केले.
सूर्यादादाने 26 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 29 धावांची खेळी केली. नंतर आपण 13व्या ओव्हरमध्ये रॉबिन मिंज (3) आणि तिलक वर्मा यांच्या विकेट्स गमावल्या.
तिलकने २५ चेंडूंत ३१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने दोन चौकार आणि दोन षटकारही मारले. नमन धीर केवळ 17 धावा करू शकला आणि मिचेल सँटनरला फक्त 11 धावा करता आल्या.
याशिवाय दीपक चहरने नेत्रदीपक फलंदाजी करत 15 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. त्याने नाबाद राहून दोन चौकार आणि दोन षटकार मारले.
एमआयचा खेळ 20 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावून संपला आणि सीएसकेसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले.
सीएसकेकडून नूर अहमदने चार आणि खलील अहमदने तीन विकेट्स घेतल्या तर नॅथन एलिस आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना दीपक चहरने दुसऱ्याच ओव्हरमध्ये चेन्नईला पहिला धक्का दिला. सीएसकेचा राहुल त्रिपाठी केवळ दोन धावा करू शकला. पाठोपाठ ऋतुराज गायकवाडने सलामीवीर रचिन रवींद्रला साथ दिली आणि दोघांनीही संयमी फलंदाजी करत संघाचा पाया मजबूत केला.
विघ्नेश पुथूरने आठव्या ओव्हरमध्ये मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने गायकवाडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गायकवाडने 26 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.
यानंतर शिवम दुबे (9), दीपक हुडा (3) आणि सॅम कुरन (4) यांच्या विकेट्स गेल्या.
रचिनने नाबाद अर्धशतक झळकावत 45 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या तर रवींद्र जडेजाने 17 धावा केल्या.
अशा रितीने चेन्नई सुपर किंग्सने 19.1 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून १५८ धावा केल्या आणि पहिला विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सकडून विघ्नेश पुथूरने तीन तर दीपक चहर आणि विल जॅकने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध शनिवारी २९ मार्च रोजी असेल.
थोडक्यात धावसंख्या
मुंबई इंडियन्स: 20 ओव्हर्समध्ये 155/9; तिलक वर्मा, 31 (25), नूर अहमद 4/18
चेन्नई सुपर किंग्स: 19.1 ओव्हर्समध्ये 158/6; रचिन रविंद्र 64 (45), विग्नेश पुथुर 3/32