News

GT vs MI: मुंबई इंडियन्सचा दुसऱ्या सामन्यात पराभव

By Mumbai Indians

एमआयकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ४८ धावा केल्या आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात आपल्या टीमला शनिवारी गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात ३६ धावांनी पराभव पत्करावा लागला.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम गोलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स देऊन १९६ धावा केल्या.

याला उत्तर देताना एमआयने २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स देऊन १६० धावा केल्या.

GT vs MI सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात टायटन्सकडून सलामी फलंदाजांनी उत्तम सुरूवात केली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगल्या फलंदाजीचे दर्शन घडवत टीमला चांगल्या स्थितीत नेले.

पहिल्या विकेटसाठी गिल आणि सुदर्शन यांनी ७८ धावांची भागीदारी केली. नवव्या ओव्हरमध्ये गिलला हार्दिक पांड्याने नमन धीरच्या हातात कॅच आऊट केले. गिलने चार चौकार आणि १ षट्कार मारून २७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या.

यानंतर सुदर्शनसोबत जोस बटलर खेळायला आला. त्याने खेळ पुढे नेताना पाच चौकार आणि एक षट्कार मारून २४ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. आपल्या टीमला १८ व्या ओव्हरमध्ये सुदर्शनची विकेट मिळाली. सुदर्शनने आपल्या टीमसाठी अर्धशतकी खेळ केला. त्याच्याखेरीज इतर कोणत्याही फलंदाजाने मोठी धावसंख्या उभारली नाही.

सुदर्शनने ४१ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. त्यात चार चौकार आणि २ षट्कार होते. सुदर्शन बाद झाल्यानंतर इतर खेळाडूही जास्त वेळ मैदानात टिकू शकले नाहीत.

गुजरातकडून शाहरूख खानने ९, शेरफाने रदरफोर्डने १८ आणि राशिद खानने ६ धावा केल्या. कगिसो रबाडा सात धावा करून नाबाद राहिला. अशा रितीने गुजरात टायटन्सच्या टीमने आपल्या टीमसमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले.

मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दोन, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर,मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सकडून सलामी फलंदाज रोहित शर्माने चौकार मारून खेळ सुरू केला. पण तो मैदानात मोठे फटके मारण्यासाठी जास्त वेळ टिकू शकला नाही आणि ८ धावा करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यानंतर सिराजने पाचव्या ओव्हरमध्ये रायन रिकेल्टनची विकेट घेतली. तो फक्त सहा धावा करून बाद झाला.

तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी खेळ पुढे नेला आणि धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी तिलक आणि सूर्या यांनी ६२ धावांची भागीदारी केली. तिलकला १२ व्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाने बाद केले.

तिलकने ३६ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि एक षट्कार होता. यानंतर आपल्या टीमच्या रॉबिन मिन्झ आणि सूर्यादादाच्या विकेट्स पडल्या.

आज सूर्यकुमार यादवचे अर्धशतक हुकले. परंतु त्याने टीमसाठी महत्त्वाच्या धावांचे योगदान दिले.

सूर्यकुमारने एक चौकार आणि ४ षट्कारांच्या मदतीने २८ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. कर्णधार हार्दिकने ११ धावा केल्या. नमन धीर आणि मिशेल सँटनर यांनी नाबाद खेळ केला आणि प्रत्येकी १८ धावा केल्या.

अशा रितीने आपल्या टीमने २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स देऊन १६० धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध असेल.

 

थोडक्यात धावसंख्या

मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये १६०/६; सूर्यकुमार यादव ४८ (२८), प्रसिद्ध कृष्णा २/१८

गुजरात टायटन्स: 20 ओव्हर्समध्ये १९६/८; साई सुदर्शन ६३ (४१), हार्दिक पांड्या २/२९