News

LSG vs MI: रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा एलएसजीकडून पराभव

By Mumbai Indians

आयपीएल २०२५ चा १६ वा सामना शुक्रवारी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. त्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला.

LSG vs MI सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स देऊन २०३ धावा केल्या आणि मुंबईसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आपला संघ २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून १९१ धावाच करू शकला.

लखनौसाठी सलामीवीर मिचेल मार्शने ३१ चेंडूत ६० धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याचा साथीदार एडन मार्करामने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या.

दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र, लखनौ सुपर जायंट्सला मधल्या फळीत धक्का बसला. निकोलस पूरन (१२) आणि कर्णधार ऋषभ पंत (२) स्वस्तात बाद झाले.

यानंतर आयुष बडोनी (३०) आणि डेव्हिड मिलर (२७) यांनी उपयुक्त खेळी खेळली, मात्र अब्दुल समद (४) आणि आकाशदीप (०) स्वस्तात बाद झाले.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीत चमकला. त्याने पुन्हा एकदा ५ विकेट घेत गोलंदाजीत आपली क्षमता दाखवली. विशेषत: शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने दोन महत्त्वाचे बळी घेतले.

लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी खास झाली नाही आणि १७ धावा होईपर्यंत आपल्या संघाने दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. विल जॅक (५) आणि रायन रिकेल्टन (१०) पॅव्हेलियनमध्ये परतले. आकाश दीप आणि शार्दुल ठाकूर यांनी हे सुरुवातीचे धक्के दिले.

यानंतर नमन धीर (४६) आणि सूर्यकुमार यादव (६७) यांनी ६९ धावांची भागीदारी करत खेळाचा ताबा घेतला. नमनने २४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले, तर सूर्याने ४३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र, स्पिनर दिग्वेशसिंग राठीने नमनला बाद करून ही जोडी फोडली.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी मोर्चा सांभाळला. मात्र 25 धावा केल्यानंतर तिलक निवृत्त झाला. त्यामुळे अखेरीस आपला संघ निर्धारित २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन केवळ १९१ धावा करू शकला आणि सामना १२ धावांनी गमावला.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना ७ एप्रिल रोजी आरसीबीविरूद्ध असेल. हा सामना वानखेडे स्टेडियवर होईल.

 

थोडक्यात धावसंख्या

लखनऊ सुपर जायंट्स: (२० ओव्हर्समध्ये २०३/८) -  मिचेल मार्श ६०, हार्दिक पांड्या ५/३६

मुंबई इंडियन्स: (२० ओव्हर्समध्ये १९१/५) - सूर्यकुमार यादव ६७, दिग्विजय राठी १/२१