News

ईशान किशनच्या द्विशतकापुढे बांग्लादेश भुईसपाट

By Mumbai Indians

शेवटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्माच्या जागेवर खेळायला आलेल्या ईशान किशनने बांग्लादेशी गोलंदाजांना भर दिवसा तारे दाखवले. आपल्या पलटनचा हा सलामी फलंदाज मर्यादित ओव्हर क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने बांग्लादेशविरूद्ध २२७ धावा कुटल्या. 

आधी फलंदाजी करायला उतरलेल्या ईशानने १३१ चेंडूंमध्ये २१० धावांचा पाऊस पाडला. त्याने २४ चौकार आणि १० षटकार ठोकले आणि भारताची धावसंख्या ५० ओव्हर्समध्ये ४०९/८ वर नेली. विराट कोहलीनेही ऑगस्ट २०१९ नंतरचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधले एक धमाकेदार शतक पूर्ण करून त्याला साथ दिली. धावांचा अक्षरशः हिमालय समोर उभा असताना बांग्लादेशी फलंदाजांवर प्रचंड दबाव आला. त्यांच्या नियमित विकेट्स पडत राहिल्या आणि १८२ धावांमध्ये ते सर्व बाद झाले. 

अर्थात आजच्या दिवसाचा स्टार ईशान किशन होता. त्याने या पहिल्या इनिंगमध्ये मागच्या दोन पराभवांचा वचपा काढला आणि भारतीयांच्या दुःखावर मलम लावले. 

ईशान किशनचा हाण की बडीव, धुरळा उडीवदिवस 

शिखर धवन लवकरच बाद झाला. त्यानंतर ईशान आणि कोहलीने स्वतःला स्थिरावायला वेळ दिला. हे दोघे स्थिरावल्यानंतर मात्र त्यांनी मैदानात ‘जाळ अन् धूर संगटच’ काढला. हा सामना आयुष्यातला शेवटचा, खेळत असलेला चेंडू शेवटचा असे समजून ते चेंडूवर तुटून पडले. 

कोहली इनिंगमध्ये सुरूवातीला मिड विकेटवर थोडक्यात वाचला. मग त्याने दुसरी बाजू सावरून धरत किशनने चालवलेल्या धडाक्याची मजा घेतली. किशनने २४ व्या ओव्हरमध्ये आपले पहिले एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातले शतक पूर्ण केले. त्यानंतर चारच ओव्हर्समध्ये त्याने १५० चा टप्पा पार केला. 

फक्त एक क्षण आणि किशनने आणखी एक विक्रम मोडीत काढला! 

पस्तिसाव्या ओव्हरमध्ये एक धाव काढून आपल्या या पॉकेट डायनॅमोने आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या प्रकारच्या खेळात ४० व्या ओव्हरपूर्वी आपले द्विशतक पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरलाय. 

किशन २०० चा टप्पा पार करणारा सर्वांत तरूण क्रिकेटपटू ठरला आहे आणि भारतीय फलंदाजांमध्ये त्याचा चौथा क्रमांक लागतो. इतर तीन फलंदाज- सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि रोहित शर्मा यांनी भारतात आपले द्विशतक झळकवले होते. त्यामुळे ईशान परदेशात जाऊन आपले द्विशतक फटकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक वेगवान द्विशतकही पूर्ण केले आहे. त्याने बांग्लादेशमध्ये सर्वोच्च वैयक्तिक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील धावसंख्या रचताना २०११ मधील शेन वॉटसनचा १८५ धावांचा विक्रमही मोडीत काढला. 

*धाप लागली बाबा!* 

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत द्विशतक पूर्ण करणाऱ्या चारपैकी तीन भारतीय खेळाडूंनी मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल ट्रॉफीसुद्धा जिंकली आहे. द्विशतक पूर्ण करणाऱ्या एकमेव न्यूझीलंडचा खेळाडू असलेल्या मार्टिन गुप्तिलनेही २०१६ मध्ये पलटनची जर्सी मिरवली होती. 

आतापर्यंत सातपैकी चार द्विशतकी खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी खेळले आहेत. (सहज सांगतो आहोत, बरं का!

कोहलीने ७२ वे शतक पूर्ण केले, भारतीयांचा जल्लोष! 

ईशान बांग्लादेशी गोलंदाजांना समाचार घेत असताना विराट कोहलीने दुय्यम स्थान स्वीकारले, पण त्यानेही ३९ व्या ओव्हरमध्ये आपले ४४ वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातले शतक पूर्ण केले. ते त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले ७२ वे शतक ठरले. त्याने ९१ चेंडूंमध्ये हा पल्ला गाठला. 

कोहली आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि त्याने रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकले आहे. *जोरदार, शानदार, दिमाखदार!*. 

अक्झर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डेथ ओव्हर्समध्ये आपल्या बॅटचे पाणी चाखवले आणि भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला. 

गोलंदाजांनीही कमाल केली 

समोर ठेवलेले लक्ष्य खूपच कठीण होते. परंतु बांग्लादेशनेही चंग बांधला होता. त्यांनी जोरदार फटके मारायला सुरूवात केली होती. परंतु त्यांना विजयश्री आपल्याकडे खेचून घेता आली नाही. त्यांच्या विकेट्स पडत राहिल्या. 

अक्झर पटेलने पहिल्या फळीतल्या फलंदाजांना बाद केल्यानंतर शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक यांनी एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही. बांग्लादेशी संघ ३४ ओव्हर्समध्ये सर्वबाद झाला. सहाही गोलंदाजांनी किमान एकेक विकेट तरी घेतली. 

भारताने सामन्याचा गड राखला पण मालिकेचा सिंह गमावला. 

थोडक्यात धावसंख्या 

भारत ५० ओव्हर्समध्ये ४०९/८ (ईशान किशन २१०, विराट कोहली ११३, शकीब अल हसन २/६८) बांग्लादेश १८२ आणि ३४ ओव्हर्समध्ये सर्व बाद (शकीब अल हसन ४३, अक्झर पटेल ३/३०). भारताकडून बांग्लादेशचा पराभव.