
MI Junior Rising Star 2025: अब्दुर रहमानच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर अ संघाचा 122 धावांनी विजय
कर्णधार अब्दुर रहमानच्या 177 धावांच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईत सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स (एमआय) ज्युनियर बॉईज रायझिंग स्टार स्पर्धेच्या साखळी सामन्यात मंगळवारी अ संघाने ड संघाला 122 धावांच्या फरकाने हरवले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अ संघाने 40 षटकांत 8 बाद 311 धावांचा डोंगर रचला. त्यात कर्णधार रहमानची 177 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याला श्रेयस गोवारीची (52 धावा) चांगली साथ लाभली. प्रतिस्पर्ध्यांचे मोठे आव्हान ड संघाला पेलवले नाही. त्यांना 40 षटकांत 7 बाद 189 धावा करता आल्या. कर्णधार अमोघ पाटील (33) आणि सलामीवीर ताहा अत्तरवाला यांच्यातील 59 धावांच्या भागीदारीमुळे ड टीमने चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. आर्यन पुरोहित (नाबाद 47) आणि आरुष पाताडेने (33) प्रतिकार केला तरी त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
मुलींच्या सामन्यात अ संघाने संघ ब संघावर 7 विकेट राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्वरा जाधवने 45 धावांची दमदार खेळी करत ब संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. मात्र, अन्य सहकार्यांची साथ न लाभल्याने त्यांची मजल 21 षटकांत 8 बाद 128 धावांपर्यंत गेली. राजसीने 15 धावांत निम्मा संघ गारद करताना त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अ संघाने 129 धावांचे माफक 13.5 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. आर्या वाजगे (नाबाद 58) आणि सलामीवीर अशिरा पाटीलची (33 धावा) दुसर्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचताना विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक:
मुले:
• क संघ - 40 षटकांत 7 बाद 245(आराध्या चव्हाण 63, देवेन यादव 47, दक्ष चौरसिया 44, शौर्य पाटील 33, वेदांत बने 25; आरव यादव 3/39) विजयी वि. ब संघ - 31.5 षटकांत सर्वबाद 154 (आरव यादव 39, आकाश मांगडे 30; दक्ष चौरसिया 4/29, युवान शर्मा 3/42, देवेन यादव 2/24).
• अ संघ - 40 षटकांत 8 बाद 311(अब्दूर रहमान 177, श्रेयश गोवारी 52, पुगझ सुंदरराज 20; ऋषभ सदके 2/66) विजयी वि. ड संघ - 40 षटकांत 7 बाद 189(आर्यन पुरोहित नाबाद 47, अमोघ पाटील 33, आरूष पाताडे 33, हर्षित बोबडे 28; वेदांत कडू 2/39).
मुली:
• अ संघ - 13.5 षटकांत 3 बाद 129(आर्या वाजगे नाबाद 58, आशिरा पाटील 33) विजयी वि. ब संघ - 21 षटकांत 8 बाद 128(स्वरा जाधव 45; राजसी 5/15, आशिरा पाटील 2/18).