News

जनरल एज्युकेशन अकॅडमीचा अंजुमन-आय-इस्लामवर विजय

By Mumbai Indians

एम आय (मुंबई इंडियन्स) ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या 16 वर्षांखालील मुलांच्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी चेंबूर येथील जनरल एज्युकेशन अकॅडमीने अंजुमन-आय-इस्लामवर दणदणीत विजय मिळवला.

जनरल एज्युकेशन अकॅडमीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 38 षटकात 6 बाद 304 अशी मोठी धावसंख्या उभारली. आयुष शिंदेचे (110 धावा) सनसनाटी शतक त्यांच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. ताहा ताल्हाने 37 धावा करताना त्याला चांगली साथ दिली. अंजुमन-आय-इस्लामसाठी दानियाल (2/29) आणि कबीर जगतापने (1/19) बऱ्यापैकी गोलंदाजी केली.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अंजुमन-आय-इस्लाम संघ17.4 षटकात केवळ 9 बाद 79 धावा करू शकला. त्यांच्याकडून हमजा खान (१३) आणि दानियाल (१२) यानांच दोन आकडी धावा करता आल्या.  अभिषेक पांडे (5/30) आणि सुमेध देसाई (3/32) यांनी प्रभावी गोलंदाजी करताना जनरल एज्युकेशन अकॅडमीचा मोठा विजय सुकर केला.

14 मुले गट सुपर नॉकआउट सामने

सर्वाधिक धावांची नोंद झालेल्या आणखी एका सामन्यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने केसी गांधी इंग्लिश स्कूलचा मोठ्या फरकाने पराभव केला. स्वामी विवेकानंदने 248 अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यात हर्षित बोबडे (99) चमकला. त्याचे शतक एका धावेने हुकले. शौर्यकांत उपाध्यायने 44 धावांचे मोलाचे योगदान दिले. केसी गांधीकडून आर्यन ठाकूर (३/४४) आणि जयंत साळुंकेने (२/२४) अचूक मारा केला.

प्रत्युत्तरादाखल, केसी गांधी संघाला मोठे आव्हान पेलवले नाही. त्यांच्याकडून अंश निकाळजेने सर्वाधिक ३१ धावा केल्या. स्वामी विवेकानंदच्या चिन्मय पाटील (४/२५) आणि रुद्र मेहताने (२/२२) भेदक गोलंदाजीसह त्यांच्या संघाला आरामात जिंकून दिले.

14 वर्षांखालील मुले गटाच्या आणखी एका रोमांचक सामन्यात ज्ञानदीप सेवा मंडळ हायस्कूलने दादरच्या डॉ. अँटोनियो डासिल्व्हा स्कूलविरुद्ध नाट्यमय विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डॉ. अँटोनियो डासिल्वा स्कूलला 24.5 षटकात केवळ 53 धावाच करता आल्या. त्यात अथर्व खोतच्या सर्वाधिक 14 धावा आहेत. मोक्ष माजगावकरने (5/10) निम्मा संघ गारद करताना प्रतिस्पर्धी संघाला हादरविले. त्याला अतुलची (3/21) चांगली साथ लाभली.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना, ज्ञानदीपच्या अथर्व कालेल (30) आणि लविशने (22) आपल्या संघाला केवळ 7.5 षटकांत विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक:

14 वर्षांखालील मुले:

• स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल - सर्वबाद २४८ (हर्षित बोबडे ९९, शौर्यकांत उपाध्याय ४४; आर्यन ठाकूर ३/४४, जयंत साळुंके २/२४) विजयी वि. केसी गांधी इंग्लिश स्कूल - (अंश निकाळजे ३१; चिन्मय पाटील ४/२५, रुद्र मेहता ४/२२).

• ज्ञानदीप सेवा मंडळ हायस्कूल - 7.5 षटकांत सर्वबाद 54 (अथर्व कालेल 30, लॅविश 22) विजयी वि. डॉ. अँटोनियो डासिल्व्हा स्कूल,दादर - 24.5 षटकांत सर्वबाद 53 (अथर्व खोत 14; मोक्ष माजगावकर 5/10, अतुल 3/21).

16 वर्षांखालील मुले:

• जनरल एज्युकेशन अकॅडमी, चेंबूर - 38 षटकांत 6 बाद 304 (आयुष शिंदे 110, ताहा तल्हा 37; दानियाल 2/29, कबीर जगताप 1/19) विजयी वि. अंजुमन-आय-इस्लाम 17.4 षटकांत 9 बाद 79 (हमजा खान 13, दानीयाल 12; दानियाल 12) अभिषेक पांडे 5/30, सुमेध देसाई ३/३२).

• अंजुमन-आय- इस्लाम अल्लाना इंग्लिश स्कूल - 40 षटकांत 9 बाद 279 (अब्दूर खान 154 अक्षय चिंचवडकर 4/33) विजयी वि. शारदाश्रम विद्यामंदिर (उत्तरकाश भगत 30; प्रभात पांडे 3/9, अब्दूर खान 2/27).