मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज अँड्र्यू सायमंड्सचे स्मरण
आज सकाळी अँड्र्यू सायमंडचा वयाच्या ४६ व्या वर्षी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या पिढीच्या सर्वांत महान ऑलराऊंडर खेळाडूंपैकी एकाच्या मृत्यूमुळे क्रिकेटजगत हळहळले आहे.
त्याला अत्यंत प्रेमाने रॉय या नावाने ओळखले जात होते. त्याने १९९८ ते २००९ या कालावधीत सर्व प्रकारांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि बॅट, बॉल आणि क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून त्याची प्रतिष्ठा वाढली. फील्डिंगमध्ये तर त्याचा हात कुणी धरू शकत नव्हते.
सायमंडने २००३ आणि २००७ सालच्या ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो रिकी पाँटिंग कर्णधार असताना तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता. अत्यंत आक्रमक आणि उत्साही असलेला सायमंड्स हा टी२० साठी टेलरमेड खेळाडू ठरला आणि आयपीएलमध्ये त्याला पहिल्याच सीझनमध्ये सहभागी करून घेण्यात आले.
डेक्कन चार्जर्ससोबत सुरूवातीचा काळ घालवल्यानंतर सायमंड्स २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला आणि ब्लू आणि गोल्ड रंगाच्या जर्सीत त्याने डोळे दिपवणारी अविस्मरणीय कामगिरी केली. सिम्मो एमआयसाठी ११ सामने खेळला आणि त्याने ३३.७५ च्या सरासरीने १३५ धावा केल्या. त्याचा सर्वोच्च ४४ नाबादचा स्कोअर त्याची माजी टीम असलेल्या डेक्कन चार्जर्सविरूद्ध झाला. त्याच्या या अत्यंत तडाखेबाज खेळीमुळे टीमला ३७ धावांनी विजय मिळाला. सायमंड्स हा आमच्या २०११-१२ च्या चॅम्पियन्स लीग टी२० विजयी टीमचा भाग होता. तो एमआयप्रति त्याच्या योगदानासाठी कायम स्मरणात ठेवला जाईल.
रॉयचा जुना प्रतिस्पर्धी आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर या बातमीने खूप दुःखी झाला. तो ट्विट केले, "अँड्रयू सायमंड्सचा मृत्यू आम्हा सर्वांसाठी खूप धक्कादायक आहे. तो एक चांगला ऑलराऊंडर तर होताच पण फील्डवर तो अक्षरशः विजेच्या चपळाईने खेळायचा. मुंबई इंडियन्समध्ये आम्ही खूप चांगला काळ एकमेकांसोबत घालवला. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. त्याच्या कुटुंब आणि निकटवर्तीयांचे सांत्वन."
सायमंड्स हा फील्डवर एक खरा ऑसी होता. त्याने मैदानात सर्वस्व दिले आणि आव्हानांचा शौर्याने सामना केला. क्रिकेटने आज एक समकालीन महान खेळाडू गमावला आहे. तुझी फार आठवण येईल, रॉय!