बुमरावर उपचार सुरूच, ऑस्ट्रेलियात मोहम्मद शामीला संधी- रोहित
“आम्ही इतका मोठा धोका पत्करू शकत नाही. आम्ही ज्या ज्या तज्ञांशी बोललो त्या सर्वांनी आम्हाला हेच सांगितले आहे.”
एखादे सैन्य त्यांचे मुख्य अस्त्र असलेल्या ब्रह्मास्त्राशिवाय युद्धावर जाणार ही गोष्ट दुःखदच असते. तेही त्या अस्त्राने मागील काही वर्षांत संपूर्ण भार आपल्या खांद्यांवर वाहिलेला असताना. पण हा कठीण निर्णय घ्यावाच लागला. सेनापतीला आपले हे अस्त्र पुढच्या आणि जास्त मोठ्या लढायांसाठी राखून ठेवणे गरजेचे आहे या गोष्टीशी तडजोड करावीच लागली.
जसप्रीत बुमराला पाठीच्या दुखापतीने चांगलेच ग्रासले आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपमधून बाहेर राहावे लागले आणि आता आणखी सहा आठवडे त्याला बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजच्या २०१९ मधील मागच्या सामन्यांपासून त्याला हा त्रास होतो आहे. त्याला आराम द्यावाच लागणार होता. फक्त किती वेळ हे माहीत नव्हते. भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पूर्ण प्रयत्न केले. शक्य तितकी वाट बघितली. अगदी शेवटपर्यंत प्रतीक्षा केली. पण भारताचे आणि बुमराचे भवितव्य लक्षात घेऊन त्यांना हा निर्णय घ्यावाच लागला.
“आम्ही त्याच्या दुखापतींबद्दल अनेक तज्ञांशी चर्चा केली. पण आम्हाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही," रोहित म्हणाला. "हा वर्ल्ड कप महत्त्वाचा आहेच पण त्याचे करियर जास्त महत्त्वाचे आहे. तो फक्त २७-२८ वर्षांचा आहे आणि त्याला अजून बरेच खेळायचे आहे.
"त्यामुळे आम्ही इतका मोठा धोका पत्करू शकत नाही. आम्ही ज्या ज्या तज्ञांशी बोललो त्या सर्वांनी हेच मत व्यक्त केले. त्याला अजून बरीच वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. तो अजून खूप खेळणार आहे आणि भारताला सामने जिंकून देणार आहे. त्याची खूप आठवण येईल यात कोणतीही शंका नाही."
२०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये खेळलेला मोहम्मद शामी आपल्या कोविड १९ च्या दीर्घ आजारातून बरा झाला आहे. त्याला सामन्यांमधून बाहेर राहावे लागले. अनेक कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस तपासण्या कराव्या लागल्या आणि त्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियाला जायला सज्ज आहे. पण अजूनही कठीण परिस्थिती आहे. त्याला त्याचे शारीरिक घड्याळ कार्यरत व्हायला, जेट लॅगमधून बाहेर पडायला, वॉर्म अप सामन्यांमध्ये खेळायला फार थोडा काळ मिळणार आहे.
परंतु रोहितला त्याची फारशी काळजी नाही. त्याला आपल्या या वरिष्ठ खेळाडूवर पूर्ण विश्वास आहे. तुमचा कर्णधार अगदी पूर्ण मनापासून तुमच्यावर विश्वास ठेवतो यापेक्षा जगात दुसरी कोणतीही सुंदर गोष्ट नाही.
"शामी साधारण दोन-तीन आठवड्यांपूर्वी कोविड-१९ ने आजारी होता. तो घरी, त्याच्या शेतात होता," रोहित म्हणाला. "त्यानंतर त्याला नॅशनल क्रिकेट एकेडमीत बोलावण्यात आले. तो तिथे गेला आणि मागच्या दहा दिवसांत त्याने खूप मेहनत केली आहे. कोविडनंतर त्याची तंदुरूस्ती खूप चांगली झाली आहे. त्याने तीन ते चार बॉलिंगची सत्रे खेळली. एकूणात, शामीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सगळे उत्तम आहे," रोहित म्हणाला.
"उद्या ब्रिस्बेनमध्ये आमचे सराव सत्र हे. तो उद्या टीमसोबत सराव करेल. आम्हाला आतापर्यंत शामीबद्दल जे काही ऐकले आहे. ते सर्व सकारात्मक आहे. दुखापती या खेळाचा एक अविभाज्य घटक असतात. त्याबद्दल फार काही करण्यासारखे नसते. अनेक सामने खेळत असताना दुखापती तर होतातच. मागील वर्षी आम्ही आमच्या संघाची शक्ती वाढवण्यावर काम केले होते.
"दुखापतींबद्दल सांगायचे झाल्यास मागील एका वर्षात आम्ही खेळाडू व्यवस्थापनावर खूप काम केले आहे. पण या गोष्टी घडतात आणि त्याबद्दल फार काही करण्यासारखे नसते. आम्ही मागच्या वर्षी खेळाडूंना सज्ज करणे आणि त्यांना संधी देणे या गोष्टींवर खूप काम केले. आम्हाला कल्पना आहे की दुखापती कधीही होऊ शकतात. त्यामुळे आम्ही खेळाडूंना भरपूर सामने खेळू द्यायची आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यावर खूप काम केले. वर्ल्ड कपमध्ये आलेल्या सर्व गोलंदाजांनी खूप सामने खेळलेले आहे. आम्ही याच गोष्टीवर भर दिला आणि आम्ही यशस्वी ठरलो असे मला वाटते."
शामीने वर्ल्डकपमध्ये सगळ्यांना अचंबित केले तर आश्चर्यचकित होऊ नका. बुमरा पुन्हा एकदा तडफदार खेळायला उतरला तरीसुद्धा आश्चर्यचकित होऊ नका. कारण या सगळ्या गोष्टीच तर क्रिकेटला खास बनवतात.