News

IND vs ENG, T20 वर्ल्ड कप: भारताकडून इंग्लंडचा पराभव. फायनलमध्ये दिमाखात एंट्री

By Mumbai Indians

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करून आईसीसी T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळाच्या आधारे २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स देऊन १७१ धावा केल्या. याला उत्तरासाठी उतरलेली इंग्लंडची टीम १६.४ ओव्हर्समध्ये १०३ धावांवर सर्व बाद झाली.

भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. विशेषतः भारतीय स्पिनर्सनी संपूर्ण सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना गप्प केले. अक्षर पटेलने जोस बटलरला बाद करून टीमला पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतर इंग्लंडच्या सर्वच विकेट्स पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक २५ धावा केल्या.

अक्षरने बटलरबरोबरच मोइन अली आणि जॉनी बेअरस्टोला बाद करून इंग्लंडच्या पहिल्या फळीला घरी पाठवले. यानंतर कुलदीप यादवने ब्रिटिश टीमच्या मधल्या फळीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. अक्षर पटेलला त्याच्या देखण्या गोलंदाजीसाठी सामनापटू किताबाने गौरवण्यात आले.

कुलदीप यादवने सॅम करण, हॅरी ब्रूक आणि क्रिस जॉर्डनला बाद केले तर जसप्रीत बुमराने फिल सॉल्ट आणि जोफ्रा आर्चरला बाद करून टीमच्या विजयात मोठे योगदान दिले.

त्यापूर्वी रोहित शर्माने भारतीय टीमला एक चांगली सुरूवात करून दिली. पण इंग्लंडविरूद्धदेखील विराट कोहलीला (९) जादू दाखवता आली नाही. याशिवाय ऋषभ पंतदेखील (४) फार चुणूक दाखवू शकला नाही. आपला दादा सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साथ देत ५० चेंडूंमध्ये ७३ धावांची भागीदारी करून टीमला मजबूत स्थितीत पोहोचवले.

या दरम्यान रोहित शर्माने अपले अर्धशतकदेखील पूर्ण केले. रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि चार चौकार मारले. याशिवाय सूर्यकुमार यादवनेदेखील टीमसाठी महत्त्वाची कामगिरी करत ३६ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या.

शेवटच्या ओव्हर्समध्ये हार्दिक पांड्याने १३ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या तर रवींद्र जडेजाने ९ चेंडूंमध्ये नाबाद १७ धावा केल्या. इंग्लंडच्या वतीने ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

आता अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होईल.

संक्षिप्त स्कोर

भारताकडून इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव.

भारत: १७१/७(२० ओव्हर) - रोहित शर्मा ५७, क्रिस जॉर्डन ३/३७

इंग्लंड: १०३/१० (१६.४  ओव्हर) -  हॅरी ब्रूक २५, कुलदीप यादव ३/१९