DC vs MI: दिल्लीला हरवून मुंबई इंडियन्सचा पहिला विजय
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३ च्या १६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सनी पराभव करून या सीझनमधला आपला पहिला विजय नोंदवला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.
टॉस जिंकून कर्णधार रोहित शर्माने दिल्लीच्या टीमला आधी फलंदाजी करण्याचे आवाहन केले. आधी फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीने १९.४ ओव्हर्समध्ये १७२ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना एमआयच्या टीमने २० ओव्हर्समध्ये १७३/४ अशी धावसंख्या उभारून सहा विकेट्सनी पहिला विजय खिशात टाकला.
वॉर्नर आणि अक्षरमुळे दिल्लीची इज्जत वाचली
आधी फलंदाजीला उतरलेल्या डीसीची सुरूवातच डळमळीत झाली. आपल्या तरूण स्पिन गोलंदाज हृतिक शौकीनने सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसलेल्या सलामी फलंदाज पृथ्वी शॉला बाद करून एमआयला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर डीसीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने मनीष पांडेसोबत खेळ सावरला आणि धावसंख्या ७० च्या पुढे नेली.
कर्णधार रोहित शर्मा याने दिल्लीच्या या खेळाडूंमध्ये होणारी भागीदारी तोडण्यासाठी अनुभवी स्पिनर पियूष चावलाच्या हातात चेंडू सोपवला. नवव्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या पियूषने आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या मनीष पांडे (२६) ला लाँग ऑफवर जेसन बेहरेनडॉर्फच्या हातात कॅच द्यायला भाग पाडले. वॉर्नर आणि पांडे यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूंमध्ये ४३ धावांची भागीदारी झाली.
मनीष पांडे बाद झाल्यानंतर दिल्लीसाठी प्रथमच खेळणाऱ्या तरूण फलंदाज यश धुलला ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज रायली मेरेडिथने बाद केले. त्यानंतर कॅरेबियन खेळाडू रॉवमेन पॉवेल आणि स्पिन अष्टपैलू खेळाडू ललित यादवला देखील पियूष चावलाने आपल्या फिरकीने चांगलेच घुमवले.
दिल्लीची फलंदाजी कोसळत असताना त्यांचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आपल्या आयपीएल करियरमधील ५८ वे आणि या सीझनमधील तिसरे अर्धशतक झळकवले. त्यानंतर डीसीचा उपकर्णधार अक्षर पटेलने कर्णधाराची पाठ राखली आणि सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंमध्ये ६७ धावांची भागीदारी केली. त्यांनी टीमचा स्कोअर १५० च्या पुढे नेऊन पोहोचवला.
मुंबईला ही भागीदारी पुन्हा धोकादायक ठरत होती. तेव्हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज मेरेडिथने अक्षर पटेलला (५४) आणि नंतर डीसीचा कर्णधार वॉर्नरला (५१) बाद करून टीमला यश मिळवून दिले. यानंतर दिल्लीचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. संपूर्ण टीम १९.४ ओव्हर्समध्ये १७२ धावांमध्ये गुंडाळली गेली.
मुंबईच्या वतीने जेसन बेहरेनडॉफ आणि पियूष चावला ने ३-३ तर रायली मेरेडिथने २ आणि हृतिक शौकीनने १ विकेट घेतली.
मुंबईने केला रोमांचक पाठलाग
विजयासाठी आवश्यक असलेल्या १७३ धावांचा पाठलाग करत असताना मुंबईचा सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी आपल्या खेळाची धडाकेबाज सुरूवात केली आणि अप्रतिम शॉट्सची मेजवानी दिली. आज हिटमॅन चांगल्याच मूडमध्ये होता. त्याने धावांचा वेग वाढवायची जबाबदारी आपल्यावर घेतली.
या दरम्यान ईशाननेदेखील कर्णधार रोहितला चांगलीच मदत केली. परंतु आठव्या ओव्हरमध्ये टीमचा स्कोअर ७१ असताना ईशान रनआऊट झाला. ईशानने २६ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. त्याने सहा षटकार ठोकले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या डावखुऱ्या तिलक वर्माने रोहितसोबत धावसंख्या वाढवायला सुरूवात केली. रोहितने या सीझनमधले पहिले अर्धशतक देखील पूर्ण केले. रोहित आणि तिलकच्या जोडीने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करून दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. तिलकने बाद होण्यापूर्वी २९ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. त्याने ४ दिमाखदार षटकारही ठोकले.
तिलक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे टीमवर थोडा ताण आला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये मुस्तफिजूर रहमानने कर्णधार रोहित शर्माला बाद केले आणि एमआयला मोठा झटका दिला.
रोहितने ४५ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ४ षटकार मारून ६५ धावा केल्या. शेवटी तर सामना खूपच रोमांचक झाला होता. कोणत्याही क्षणी पारडे कोणत्याही संघाच्या दिशेने वळेल असे वाटत होते. पण कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिडने अत्यंत शांत डोक्याने फलंदाजी करून आपल्या टीमला विजय मिळवून दिला.
शेवटच्या ओव्हरमध्ये एमआयला विजयासाठी ५ धावा आणि शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. एनरिक नॉर्कियाच्या चेंडूवर टिम डेव्हिडला लाँग ऑफवर खेळून २ धावा करता आल्या आणि अशा प्रकारे आपल्या टीमने या वर्षीचे विजयाचे खाते उघडले.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध होईल.
थोडक्यात धावसंख्या:
मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटलचा ६ विकेटनी पराभव.
दिल्ली कॅपिटल्स: १७२/१० (१९.४ ओव्हर)
अक्षर पटेल- ५४ (२५); जेसन बेहरेनडॉफ- ३/२३
मुंबई इंडियन्स: १७३/४ (२० ओव्हर्स)
रोहित शर्मा- ६५ (४५); मुकेश कुमार - २/३०
सामनापटूः रोहित शर्मा