MIvsRR - राजस्थान रॉयल्सला हरवून मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते उघडले
टाटा आयपीएल 2022 च्या 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खात्यावर या सीझनचा पहिला विजय नोंदवला गेला आहे. आज झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 5 विकेटने हरवून चालू सीझनमध्ये पहिले दोन गुण प्राप्त केले आहेत.
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमआयचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरआरच्या टीमने प्रथम फलंदाजी करून जोस बटलरच्या 67 धावांच्या इनिंगमुळे 20 ओव्हरमध्ये 6 विकेट देऊन 158 धावा काढल्या.
धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या एमआयने 5 विकेट देऊन हे लक्ष्य 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले. एमआयच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या इनिंग्समुळे एमआयला हे लक्ष्य साध्य करताना फारसा त्रास झाला नाही.
राजस्थान रॉयल्सचा खेळ असा होता
आरआरची सुरूवात काही विशेष ठरली नाही. त्यांचे ओपनिंग फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि जोस बटलर या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी धाली. हृतिक शौकीनने पडिक्कलला 15 धावांच्या स्कोअरवर बाद केले.
त्यानंतर कर्णधार संजू सॅम्सन फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अवघ्या सात चेंडूंवर तो बाद झाला. त्यात त्याने 2 षटकार फटकावून 16 धावा काढल्या.
एकामागून एक विकेट्स जाताना आरआरची पडझड सुरू होती. डेरिल मिचेलची इनिंग स्लो होती. त्याने 20 चेंडूंमध्ये 17 धावा काढल्या. त्याने 91 धावांच्या स्कोअरवर आपली तिसरी विकेट दिली.
त्याचवेळी उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरने एका बाजूला गड सांभाळला आणि 52 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 4 षटकार फटकावून 67 धावा काढल्या. तो आऊट झाल्यानंतर आरआरच्या एकाही फलंदाजाला आपले पाय रोवता आले नाहीत.
शिमरॉन हेटमायरची इनिंग खूपच स्लो होती. त्याने 14 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा काढल्या आणि रियान परागने 3 चेंडूंवर अवघ्या 3 धावा काढल्या. अर्थात आर अश्विनच्या कॅमियोमुळे (9 चेंडूंमध्ये 21 धावा) राजस्थानला चांगली धावसंख्या मिळवणे शक्य झाले.
मुंबईच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. हृतिक शौकीनने 3 ओव्हरमध्ये 47 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. रायली मेरेडिथने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 2 विकेट घेतल्या आणि कुमार कार्तिकेय आणि डॅनियल सॅम्स यांनी प्रत्येकी एकेक विकेट आपल्या खिशात टाकल्या.
मुंबई इंडियन्सने लक्ष्य साध्य केले
विजयासाठी 159 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली एमआयच्या टीमला पहिला धक्का कर्णधार रोहित शर्माच्या विकेटमुळे बसला. टीमची धावसंख्या 2.3 ओव्हरमध्ये 23 धावा असताना रोहित 5 चेंडूंवर 2 धावा काढून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद धाला. सामन्यात चांगला सूर पकडलेला असतानाच ईशान किशनने ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर सॅम्सनला कॅच दिला. किशनने 18 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार फटकावून 26 धावा केल्या.
यानंतर विजयाची जबाबदारी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या खांद्यावर होती. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची एक उत्तम भागीदारी केली. परंतु हे दोन्ही फलंदाज एमआयच्या 122 च्या धावसंख्येवर पॅव्हेलियनला परतले. सूर्याने 39 चेंडूंवर 5 चौकार आणि 2 षटकार ठोकून 51 धावा केल्या तर तिलकने 30 चेंडूंवर 1 चौकार आणि 2 षटकार ठोकून 35 धावा काढल्या.
त्यानंतर टिम डेव्हिडने 9 चेंडूंमध्ये नाबाद 20 धावा केल्या तर कायरन पोलार्ड 14 ने 10 आणि डॅनियल सॅम्सने एका चेंडूवर 6 धावा काढून आपल्या टीमच्या गळ्यात पहिल्या विजयश्रीची माळ घातली.
आरआरकडून ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन यांनी एकेक विकेट घेतली.
पुढील समीकरण
या विजयासोबत एमआयने अंक तालिकेत दोन गुण प्राप्त केले आहेत. आमची टीम येणाऱ्या सामन्यांमध्येही हाच कित्ता गिरवून यश प्राप्त करेल अशी आम्हाला आशा आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 6 मे रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टाइटन्सविरूद्ध होईल. हा सामना रात्री म्हणजे 7:30 वाजल्यापासून पाहता येईल.