News

टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पहिल्या चॅम्पियन्सचा प्रवास

By Mumbai Indians

२००७ सालच्या सर्वोच्च कामगिरीपासून ते नंतरच्या सीझन्समध्ये झालेल्या निराशेपर्यंत आणि २०१४ आणि २०१६ च्या दुर्दैवी अपयशापासून ते २०२२ मध्ये आता पुन्हा खेळायला सज्ज होईपर्यंत अनेक गोष्टींच्या आठवणी आपल्या मनात आहेत. रो-हिट-मॅन आणि त्याचा संघ ऑस्ट्रेलियात आता आला आहे. तो जगातल्या सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून खेळणार आहे आणि २००७ ची पुनरावृत्ती करण्यासाठी ते सज्ज आहेत. 

तर आता आपण या विश्वचषक मालिकांमधील भारताच्या मागील काही वर्षांची कामगिरी पाहूया.

टी२० वर्ल्ड कप २००७: पहिला वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद

भारताने २००७ च्या मालिकेत अत्यंत धडाकेबाज सुरूवात केली. पाकिस्तानविरूद्धचा ग्रुप टप्प्यातील सामना बरोबरीत सुटला. पण बॉल आऊटमध्ये भारताला ऐतिहासिक ३-० ने विजयी घोषित करण्यात आले. न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या सुपर ८ सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध धडाकेबाज विजय मिळवून सामन्यात परतला. 

प्रमुख वैशिष्टे: स्टुअर्ट ब्रॉडविरूद्ध युवराज सिंगने सहा षटकार ठोकले. टी२०आयमध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला. या स्पर्धेतला प्रेक्षकांचा आवडता आणि विद्यमान ओडीआय वर्ल्डकप चॅम्पियन्स असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपांत्य फेरीत पूर्ण फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने हरवले आणि पाकिस्तानविरूद्ध रोमांचक वर्ल्ड टी२० अंतिम सामना खेळला. एमएस धोनीच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना हरवून पहिला टी२० वर्ल्ड कप जिंकला. 

सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज: गौतम गंभीर (२२७ धावा)

सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू: आरपी सिंग (१२ विकेट्स)

टी२० वर्ल्ड कप २००९: इंग्लंडमध्ये पीछेहाट

२००९ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये भारताने ग्रुप स्टेजचा टप्पा पार करताना बांग्लादेश आणि आयर्लंडला हरवले. परंतु वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुपर ८ मध्ये पराभव झाल्यामुळे टीमचा प्रवास संपला. 

सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज: युवराज सिंग (१५३ धावा)

सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडूः झहीर खान आणि प्रज्ञान ओझा (७ विकेट्स)

टी२० वर्ल्ड कप २०१०: कॅरेबियनमध्ये कठीण अवस्था

कॅरेबियनमध्ये २०१० टी२० वर्ल्ड कपमध्ये टी२० शतक फटकावणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. भारताने पुन्हा एकदा मालिकेच्या पहिल्या टप्प्यात वर्चस्व गाजवले आणि अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेवर विजय प्राप्त केला. पण त्यांना सुपर ८ मध्ये एकही सामना जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्याविरूद्ध त्यांना हार पत्करावी लागली. 

सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू: सुरेश रैना (२१९ धावा)

सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू: आशिष नेहरा (१० विकेट्स)

टी२० वर्ल्ड कप २०१२: सुपर ८ मधून बाहेर पडण्याची हॅटट्रिक

आणखी एक वर्ल्ड टी२० कप, पुन्हा एकदा ग्रुप स्टेजमधून पुढे गेल्यावर सुपर ८ मधून बाहेर पडणे. परंतु, या वेळी भारतीय क्रिकेट संघाने सुपर ८ चे तीन सामने जिंकले. मात्र, पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या दणकून पराभवामुळे भारताच्या पात्रतेच्या आशा संपुष्टात आल्या. 

सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज: विराट कोहली (१८५ धावा)

सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू: लक्ष्मीपती बालाजी (९ विकेट्स)

टी२० वर्ल्ड कप २०१४: अंतिम फेरीत श्रीलंकेची सरशी

२०१४ मध्ये बांग्लादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली. त्यांनी अंतिम फेरीपर्यंत खेळल्या जाणाऱ्या पाचही सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धही त्यांनी नेत्रदीपक विजय मिळवला. परंतु अंतिम फेरीत श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना टिकू दिले नाही. त्यामुळे भारताला फक्त १३० धावा करता आल्या आणि श्रीलंकेने त्या अगदी सहजपणे पूर्ण केल्या. विराट कोहलीने टी२० वर्ल्ड कपच्या एकाच वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला. हा विक्रम आजही कायम आहे. 

सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज: विराट कोहली (३१९ धावा)

सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू: रवीचंद्रन अश्विन (११ विकेट्स)

टी२० वर्ल्ड कप २०१६: वानखेडेवर निराशा

भारताने आयसीसी मेन्स टी२० वर्ल्डकपचे यजमानपद सर्वप्रथम २०१६ मध्ये स्वीकारले. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेशवर विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध (व्हर्चुअल उप-उपांत्य फेरी) शेवटच्या सुपर १० सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहोचता आले. परंतु वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी वानखेडे स्टेडियमवर भारतीय गोलंदाजीचा फडशा पाडला. त्यांनी तब्बल १९२ धावांचा पाठलाग सहजपणे केला आणि भारतीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. 

सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज: विराट कोहली (२७३ धावा)

सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू: हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरा (५ विकेट्स)

टी२० वर्ल्ड कप २०२१: सुपर १२ मध्ये निराशा

अलीकडेच ओमान आणि यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी भारताला पहिल्याच सुपर १२ मध्ये पराभव चाखवला. त्यानंतर भारतीय संघाने स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि नामिबियाविरूद्ध प्रचंड विजय प्राप्त केल्यावरही त्यातून सावरणे अशक्य झाले. 

सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज: केएल राहुल (१९४ धावा)

सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडूः रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमरा (७ विकेट्स)

सध्या टी२० वर्ल्डकपमध्ये मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ८४७ धावा केल्या आहेत. टी२० वर्ल्डकपमध्ये रवीचंद्रन अश्विन हा २६ विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. 

हे दोघेही २०२२ मध्ये टीमचा भाग आहेत आणि भारत २३ ऑक्टोबर रोजी पहिला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे. १५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का?