News

ZIM vs IND: भारताकडून झिम्बाब्वेचा शेवटच्या सामन्यात ४२ धावांनी पराभव. मालिका ४-१ ने जिंकली

By Mumbai Indians

झिम्बाब्वे विरूद्ध भारत यांच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा ४२ धावांनी पराभव करून मालिका ४-१ ने आपल्या नवावर केली. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला गेला.

भारताने शेवटच्या सामन्यात दोन बदल केले होते. या सामन्यात रियान पराग आणि मुकेश कुमार यांना संधी दिली गेली.

झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स देऊन १६७ धावा केल्या. याला उत्तर देण्यासाठी उतरलेल्या यजमान संघाला लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आले आणि त्यांना १८.३ ओव्हर्समध्ये १० विकेट्स देऊन फक्त १२५ धावा करता आल्या.

प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये भारतीय टीमने यशस्वी जैस्वालची महत्त्वाची विकेट दिली. जैस्वालला दोन षटकारांच्या मदतीने ५ चेंडूंमध्ये फक्त १२ धावा करता आल्या.

चौथ्या ओव्हरमध्ये भारताला ब्लेसिंग मुजरबानीने अभिषेक शर्माच्या रूपाने दुसरा झटका दिला. अभिषेक शर्माने ११ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. यानंतर शुभमन गिलला रिचर्ड नगर्वाने बाद केले. शुभमनने दोन चौकारांसह १४ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या.

शुभमन गिल बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने रियान परागसोबत खेळ सावरला. सॅमसन आणि रियान यांच्यादरम्यान चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी झाली. परागला ब्रँडन मावुटाने नगर्वाच्या हातून कॅच आऊट केले. परागने २४ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या.

सॅमसनच्या अप्रतिम अर्धशतकी खेळाच्या मदतीने भारताने आपली जागा आणखी मजबूत केली. संजूने ४० चेंडूंमध्ये अर्धशतक केले. १८ व्या ओव्हरमध्ये मुजरबानीने सॅमसनला बाद केले. संजू सॅमसनने एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४५ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या.

यजमान संघ १६८ धावांचा पाठलाग करायला उतरला. पण त्यांची सुरूवात चांगली झाली नाही. मुकेश कुमारने झिम्बाब्वेला सुरूवातीलाच दोन झटके दिले. पहिल्या ओव्हरमध्ये कुमारने वेस्ली मधवेरेला खाते उघडूही दिले नाही. यानंतर कुमारने ब्रायन बेटने (१०) ला पॅव्हिलियनला परत पाठवले.

तदिवनाशे मारूमाणी आणि डियॉन मायर्स यांनी नंतर खेळ पुढे नेला. नवव्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने झिम्बाब्वेला तिसरा झटका दिला. मारूमणीने ५ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या.

यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर झिम्बाब्वेचे खेळाडू जास्त काळ मैदानात टिकू शकले नाहीत. त्यांनी एकामागून एक विकेट्स गमावल्या. मायर्सने ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३२ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. १४ व्या ओव्हरमध्ये सिकंदर रझाला (८) शिवम दुबेने रन आऊट केले.

जॉनथन कॅम्पबेल ४, क्लाइव मदांडे १ आणि ब्रँडन मवुटाने ४ धावा केल्य तर फराज अक्रमने १३ चेंडूंमध्ये २७ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

अशा रितीने झिम्बाब्वेच्या संघाने १८.३ ओव्हर्समध्ये १० विकेट्स देऊन १२५ धावा केल्या. यासोबत भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यता ४२ धावांनी विजय नोंदवून मालिका ४-१ आपल्या नावावर केली.

भारतकडून मुकेश कुमारने चार विकेट आणि शिवम दुबेने दोन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त स्कोर:

भारत: १६७/६ (२० ओव्हर्स) - संजू सॅमसन ५८, ब्लेसिंग मुजरबानी २/१९

झिम्बाब्वे: १२५/१० (१८.३ ओव्हर्स) - डियॉन मायर्स ३४, मुकेश कुमार ४/२२